मे महिन्यात घेण्यात आलेली अखिल भारतीय वैद्यकीय प्रवेश पूर्वपरीक्षा (एआयपीएमटी)४४ विद्यार्थ्यांनी केलेल्या गैरप्रकारांमुळे सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली असून आता ६.३ लाख विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे. चार आठवडय़ांत ही परीक्षा पुन्हा घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
सुटीतील पीठाचे न्यायाधीश आर. के. अगरवाल व अमिताव रॉय यांनी या परीक्षेशी संबंधित संस्थांनी नव्याने परीक्षा घेण्यासाठी सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन या संस्थेची मदत घेण्यास सांगितले आहे. याचिका मान्य करण्यात आल्या असून सीबीएसई एआयपीएमटी २०१५ ही परीक्षा चार आठवडय़ांत घेईल, असा निकाल त्यांनी दिला.
परीक्षेत मोठय़ा प्रमाणात हेराफेरी झाली असून विद्यार्थ्यांनी उत्तरे लिहिताना परीक्षा कक्षात जागा बदलून घेतल्याच्याही घटना घडल्या आहेत. न्यायालयाने यावर १२ जूनला निकाल राखून ठेवला होता. परीक्षेतील गैरप्रकार पाहता ती पुन्हा घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. ही परीक्षा ३ मे रोजी घेतली होती, त्या वेळी हे गैरप्रकार झाले. एका विद्यार्थ्यांला जरी बेकायदेशीर फायदा झाला तर परीक्षेला अर्थ उरत नाही. यात सीबीएसईला जबाबदार धरता येणार नाही, पण त्यांनी यापुढे परीक्षा घेताना काळजी घ्यावी, असा सल्ला न्यायालयाने दिला आहे. सीबीएसईची बाजू महाधिवक्ता रणजित कुमार यांनी मांडली. फक्त ४४ विद्यार्थ्यांना गैरप्रकारांचा फायदा मिळाला म्हणून यासाठी ६.३ लाख विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द न करण्याची मागणी केली होती. यावर सुटीच्या न्यायालयाने यापूर्वीच्या सुनावणीवेळी हरयाणा पोलिसांनी गैरमार्गाने फायदा मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे क्रमांक अहवालासह द्यावेत. परीक्षेची पवित्रता व गांभीर्य संशयाच्या भोवऱ्यात आल्यामुळे परीक्षा पुन्हा घेण्यावाचून पर्याय नाही, घाईने निर्णय घेण्याची आमची इच्छा नाही, असे म्हटले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा