मध्य दिल्लीतील गोल मार्केट भागातील निवासस्थानी आपली पत्नी नयना साहनी हिचा खून करून तिचा मृतदेह तंदूरमध्ये जाळण्याचे भयानक कृत्य करणारा युवक काँग्रेसचा नेता सुशील शर्मा याला सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा कमी करून जन्मठेपेची शिक्षा दिली आहे. अठरा वर्षांपूर्वी घडलेली ही घटना काळजाचा थरकाप उडवणारी अशीच होती.
शर्मा याची शिक्षा कमी करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे, की त्याची पाश्र्वभूमी गुन्हेगारी नाही. त्याने पूर्वी गुन्हे केलेले नाहीत. नयना साहनीचा खून हा ताणलेल्या व्यक्तिगत नात्यामुळे त्याने केला आहे.
सुशील शर्मा याला न्यायालयाने दिलासा दिला त्या वेळी नयनाच्या कुटुंबातील कुणीही व्यक्ती त्याच्या विरोधात उपस्थित नव्हती. पत्नीचा खून केल्याबद्दल त्याला बराच पश्चात्ताप झालेला आहे व त्याच्यापासून समाजाला धोका नाही असे न्यायालयाने म्हटले आहे.
नयनाचे विवाहबाहय़ संबंध असल्याच्या संशयावरून सुशील शर्मा याने तिचा खून करताना देहाचे तुकडे केले व नंतर ते सरकारी मालकीच्या अशोकयात्री निवास या हॉटेलच्या तंदूर भट्टीत जाळून टाकले. सरन्यायाधीश पी. सतशिवम यांनी शर्माच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणारे अपील मंजूर केले व त्याला मृत्युदंडाची शिक्षा कमी करून जन्मठेप दिली. दिल्ली उच्च न्यायालयाने त्याच्या मृत्युदंडाच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले होते.
२-३ जुलै १९९५च्या रात्री घडलेली ही घटना आहे. त्यात सारा देशच हादरला होता. न्यायालयाने सांगितले, की आता सुशील शर्मा याला उर्वरित सगळे आयुष्य तुरुंगात काढावे लागेल, त्यात काही प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतील. शर्मा याने असा दावा केला, की आपल्याला परिस्थितिजन्य पुराव्याच्या आधारे दोषी ठरवण्यात आले व त्यामुळे आपल्याला मृत्युदंड देऊ नये.
शर्मा याने २००७ मध्ये दाखल केलेल्या याचिकेत म्हटले होते, की उच्च न्यायालयाने आपण केलेला गुन्हा हा दुर्मिळात दुर्मिळ असल्याचे कारण चुकीने दाखवून फाशीची शिक्षा सुनावली होती. उच्च न्यायालयाने १९ फेब्रुवारी २००७ रोजी कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले होते. सुशील शर्माचे वर्तन हा दुराचाराचा कळस असल्याचे न्यायालयाने म्हटले होते.
कनिष्ठ न्यायालयाने त्याला दोषी ठरवताना लावलेली कलमे बरोबर आहेत व त्याला दया दाखवता येणार नाही असे उच्च न्यायालयाने म्हटले होते. फाशीऐवजी जन्मठेप देण्याची मागणी त्या वेळी फेटाळली होती.
 रागाच्या भरात हे कृत्य झाले हा बचाव फेटाळून लावला गेला. कनिष्ठ न्यायालयाने ७ नोव्हेंबर २००३ रोजी शर्मा याला फाशीची शिक्षा सुनावली होती.

Story img Loader