कुडनकुलम येथील अणू प्रकल्पाच्या सुरक्षेबाबत सर्वतोपरी खबरदारी घेण्यात आली आहे. हा प्रकल्प जनतेच्या हिताचा असल्याचे स्पष्ट करीत सर्वोच्च न्यायालयाने कुडनकुलम अणू प्रकल्पाला सोमवारी हिरवा कंदील दाखवला आहे.
प्रकल्पाचा फायदा
न्या. के एस राधाकृष्णन आणि दीपक मिश्रा यांच्या खंडपीठाने याबाबत निर्णय देताना स्पष्ट केले की, भविष्यात ऊर्जेची समस्या अधिक उग्र होणार आहे. त्यामुळे सध्याची गरज भागवण्यासाठी तसेच भविष्यात कमी खर्चिक, मुबलक वीज उपलब्ध व्हावी यासाठी कुडनकुलम अणू ऊर्जा प्रकल्प उपयुक्त आहे. शिवाय या अणू ऊर्जा प्रकल्पामुळे देशाच्या आर्थिक विकासालाही हातभार लागेल.
विरोधकांचा आक्षेप
हा प्रकल्प झाल्यास त्यातून निर्माण होणाऱ्या धोकादायक कचऱ्यामुळे स्थानिकांच्या आरोग्यावर परिणाम होईल. याशिवाय या अणू ऊर्जा प्रकल्पामुळे कुडनकुलम तसेच आजूबाजूच्या पर्यावरणाचा मोठय़ा प्रमाणात ऱ्हास होईल, अशी भीती या प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
सुरक्षेबाबत मार्गदर्शक तत्त्वे
कुडनकुलम अणू ऊर्जा प्रकल्प भविष्याच्या दृष्टीने अतिशय आवश्यक आहे. मात्र लोकांच्या सुरक्षेला आणि पर्यावरणाच्या संवर्धनाला सर्वाधिक प्राधान्य देवून हा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी सुरक्षा तसेच पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयाने १५ मार्गदर्शक तत्त्वे सुचविली आहेत.
विरोध करणाऱ्यांवरील गुन्हे मागे घ्या
सुरक्षेच्या कारणास्तव स्थानिकांनी या अणू ऊर्जा प्रकल्पाला मोठय़ा प्रमाणात विरोध केला आहे. हा प्रकल्प रद्द करण्यासाठी दाखल केलेली याचिका ही योग्य आहे. मात्र या प्रकल्पाचे महत्त्व लक्षात घेता भविष्याच्या दृष्टीने सर्व घटकांचा सखोल अभ्यास करूनच अणू ऊर्जा प्रकल्पाला परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान या प्रकल्पाच्या विरोधात निदर्शने करणाऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे रद्द करण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली आहे.
‘दुर्दैवी निर्णय’
कुडनकुलम अणू ऊर्जा प्रकल्पाला स्थानिकांनी मोठय़ा प्रमाणात विरोध केला आहे. मात्र तरीही सर्वोच्च न्यायालयाने या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला असून हा निर्णय दुर्दैवी असल्याचे मत केरळमधील माकपचे विरोधी पक्षनेते व्ही. एस. अच्युतानंदन यांनी व्यक्त केले. अनेक तज्ज्ञांनी प्रकल्पाच्या सुरक्षेबाबत शंका व्यक्त केली असताना या प्रकल्पाचा मार्ग मोकळा केल्यामुळे त्या भागातील नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण राहील, असेही अच्युतानंदन म्हणाले.
‘स्वागतार्ह निर्णय’
कुडनकुलम प्रकल्पाला सर्वोच्च न्यायालयाने दाखवलेला हिरवा कंदील हा निर्णय स्वागतार्ह असल्याचे मत जनता पक्षाचे प्रमुख सुब्रमण्यम स्वामी यांनी व्यक्त केले. हा प्रकल्प आता निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या कामात कुणी अडथळा आणल्यास तो विरोध मोडून काढावा, असेही स्वामी यांनी सांगितले. कुडनकुलम अणू ऊर्जा प्रकल्पाला विरोध करणे हे देशविरोधी धोरण असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रकल्पविरोधकांचा आक्रोश
प्रकल्पाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मंजुरी हा अन्यायी निर्णय असल्याचे कुडनकुलम अणू ऊर्जा प्रकल्पविरोधी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. याविरोधात आम्ही सहकारी संघटनांशी बोलून पुढील धोरण ठरवू, असे पीपल्स मुव्हमेंट अगेन्स्ट न्युक्लिअर एनर्जी संघटनेचे नेते पुष्परायन यांनी सांगितले.

Story img Loader