टूजी स्पेक्ट्रम आणि कोळसा खाणवाटप गैरव्यवहारात आरोप ठेवण्यात आलेल्या व्यक्तींची भेट घेतल्यावरून टीकेचे धनी झालेले सीबीआय (केंद्रीय अन्वेषण विभाग)चे प्रमुख रणजित सिन्हा यांना कोळसा खाण चौकशीतून बाजूला ठेवण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात एका स्वयंसेवी संस्थेने केली आहे. या प्रकरणात सिन्हा हस्तक्षेप करण्याची शक्यता असून त्यांना चौकशी प्रक्रियेतून बाजूलाच ठेवणे योग्य होईल, असे या संस्थेने अर्जात म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिका अर्जात ‘कॉमन कॉज’ या स्वयंसेवी संस्थेने सिन्हा यांच्या चौकशीतील समावेशाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सिन्हा यांच्या दिल्लीतील ‘२ जनपथ’वरील निवासस्थानाच्या नोंदवहीत काही ‘प्रभावशाली’ व्यक्तींची नावे आहेत. या सर्व व्यक्तींवर कोळसा खाणवाटप गैरव्यवहार आणि टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्यात गुंतल्याचा आरोप आहे. कोळसा खाणवाटपातील घोटाळ्याची व्याप्ती पाहता त्याची पूर्णत: निर्दोष चौकशी व्हावी, पण सिन्हा यांच्या ‘महत्त्वपूर्ण आणि प्रभावशाली’ व्यक्तींच्या भेटीमुळे कोळसा खाण घोटाळ्यातील चौकशीवर त्याचा परिणाम होऊ शकतो, असेही पुढे स्पष्ट करण्यात आले आहे.
सिन्हा यांच्या निवासस्थानाच्या नोंदवहीतील मजकूर अत्यंत स्फोटक आहे. देशाला हादरवून टाकणाऱ्या तीन घोटाळ्यांतील ‘लाभार्थी’ आणि ‘बडय़ा व्यक्ती’ सिन्हा यांच्या घरी पहाटेपासून हजेरी लावत होत्या. काही जणांशी तर सिन्हा रात्री उशिरापर्यंत ‘चर्चा’ करीत होते. त्यामुळे सिन्हा यांच्या चौकशीतील सहभागीविषयी आम्हाला शंका आहे. त्यामुळे ही चौकशी कोणत्याही व्यक्तीच्या हस्तक्षेपाशिवाय तसेच राजकीय प्रभावमुक्त व्हावी, अशी विनंती या याचिकेत न्यायालयाला करण्यात आल्याचे ‘कॉमन कॉज’चे प्रशांत भूषण यांनी सांगितले.
‘कॉमन कॉज’चे आक्षेप..
*कोळसा खाणवाटप गैरव्यवहारात सीबीआय संचालक म्हणून अनावश्यक हस्तक्षेप केल्याची अनेक उदाहरणे प्रकाशात आली आहेत.
*कोळसा खाण गैरव्यवहारात चौकशी सुरू असलेले विजय दर्डा आणि त्यांच्या मुलगा देवेंद्र दर्डा यांच्याशी अनेकदा बैठक
*माजी केंद्रीय मंत्री सुबोधकांत सहाय यांचा भाऊ कोळसा खाणवाटपातील एक लाभार्थी आहे. त्यांची सीबीआयच्या वतीने चौकशी सुरू आहे. त्यांचीही सिन्हा यांनी भेट घेतली आहे.
*सिन्हा यांच्या निवासस्थानी भेट देणाऱ्या व्यक्तींची नोंदवहीतील नावे सर्वात स्फोटक आणि अस्वस्थ करणारी आहेत.
*सिन्हा यांची भेट घेणाऱ्या व्यक्तींसोबत सीबीआयचा एकही अधिकारी निवासस्थानी उपस्थित नव्हता.
*निवासस्थानाच्या नोंदवहीतील शेकडो पानांवर हजारो व्यक्तींची नावे. यात त्यांनी कधी आणि कोणत्या वेळी भेट दिल्याची नोंद आहे. याशिवाय वाहन क्रमांकही आहेत. हा सारा प्रकार कोणत्याही चौकशीत सहज उघड होऊ शकतो.
सिन्हा यांच्या निवासस्थानी भेट घेणाऱ्या व्यक्तींमध्ये अनिल धीरूभाई अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीतील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यांच्याशी सिन्हा यांनी सविस्तर चर्चा केली आहे, हे स्पष्ट झाले आहे.
प्रशांत भूषण, कॉमन कॉज

Story img Loader