नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने शेतकरी नेते जगजीत सिंह डल्लेवाल यांची स्तुती केली असून ज्यांचा कोणताही राजकीय अजेंडा नसून ते खरे शेतकरी नेते असल्याचे मत व्यक्त केले.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषणाला बसलेले शेतकरी नेते जगजीत सिंग डल्लेवाल यांनी शुक्रवारी सकाळी पाणी पिऊन उपोषण संपवले असल्याची माहिती शुक्रवारी पंजाब सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिली. न्यायमूर्ती सूर्य कांत आणि न्या. एन. कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान, पंजाबचे महान्यायवादी गुरमिंदर सिंह यांनी खनौरी आणि शंभू सीमेवरील सर्व मार्ग वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात आल्याची माहितीदेखील दिली.

या माहितीनंतर खंडपीठाने डल्लेवाल यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

अहवाल सादर करण्याचे निर्देश

खंडपीठाने पंजाब आणि हरियाणा सरकारला विद्यामान स्थितीबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार असलेल्या समितीलाही शेतकऱ्यांच्या तक्रारींची पडताळणी करण्याचे निर्देश दिले.

यासोबतच डल्लेवाल यांना वैद्याकीय मदत देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल पंजाबचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांच्याविरुद्ध अवमानाच्या कारवाईलाही न्यायालयाने स्थगिती दिली.

१९ मार्च रोजी चंडीगड येथे केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय शिष्टमंडळासोबत चर्चा झाल्यानंतर परतत असताना पोलिसांनी सरवनसिंग पंढेर आणि डल्लेवाल यांच्यासह अनेक शेतकरी नेत्यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर पोलिसांनी शंभू आणि खनौरी सीमेवर शेतकऱ्यांनी उभारलेले तात्पुरते अडथळे हटवले होते. यानंतर शंभू-अंबाला आणि संगरूर-जिंद महामार्गावर वाहनांची वाहतूक पुन्हा सुरू झाली. गेल्या वर्षी १३ फेब्रुवारीपासून पंजाब आणि हरियाणामधील शंभू आणि खनौरी सीमेवर शेतकरी तळ ठोकून होते, तेव्हा सुरक्षा दलांनी त्यांना दिल्लीला जाण्यापासून रोखले होते.

काही लोकांना शेतकऱ्यांच्या तक्रारी सुटू नये असेच वाटते. परिस्थितीपासून आम्ही अनभिज्ञ नाही. आम्हाला सर्व माहीत आहे. – सर्वोच्च न्यायालय