राज्यातील मराठा समाजाला शिक्षण आणि सरकार नोकऱ्यांमध्ये १६ टक्के आरक्षण देण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला स्थगिती देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यात सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला. त्यामुळे राज्य सरकारला आणखी एक धक्का बसला आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा आणि मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. याविरोधात करण्यात आलेल्या याचिकांवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती देण्याचा अंतरिम आदेश दिला होता. या विरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, ‘हा केवळ अंतरिम आदेश आहे. मुंबई उच्च न्यायालयाला यावर निर्णय घेऊ द्या,’ असे सांगत सरन्यायाधीश एच. एल. दत्तु यांच्या पीठाने राज्य सरकारसह अन्य काही व्यक्ती/संस्थांनी केलेल्या याचिकांची सुनावणी घेण्यास नकार दिला. मात्र, उच्च न्यायालयाने या प्रकरणाची जलद सुनावणी करावी, अशा सूचनाही दिल्या.
मुंबई उच्च न्यायालयाच्या एक सदस्यीय पीठाने मराठा आरक्षणाच्या स्थगितीचे अंतरिम आदेश देताना याविषयीचे आपले मत स्पष्टपणे मांडले आहे, असे राज्य सरकारतर्फे गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आले. त्यावर, ‘संबंधित न्यायाधीश आता या प्रकरणाची सुनावणी घेणार नाहीत. उच्च न्यायालयाचे अन्य न्यायमूर्ती याचिकांवर सुनावणी घेतील,’ असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा