शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी तिरस्कारपूर्ण भाषणे केली असल्याने त्यांची राजकीय पक्ष म्हणून मान्यता काढून घ्यावी, यासाठी करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाचे म्हणणे काय आहे, अशी विचारणा केली आहे.
शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी तिरस्कारपूर्ण भाषणे केली होती, त्यामुळे त्यांच्या पक्षाची मान्यता रद्द करावी, अशी मागणी एका याचिकेद्वारे करण्यात आली होती. न्या. आर. एम. लोढा आणि न्या. ए. आर. दवे यांच्या पीठाने त्यासंदर्भात निवडणूक आयोगाला म्हणणे सादर करण्यासाठी नोटीस पाठविली आहे.
राज ठाकरे यांनी बिहारी जनतेबद्दल केलेले वक्तव्य आणि परराज्यांमधील नागरिकांचे मुंबईत उपद्रवमूल्य आहे, हे उद्धव ठाकरे यांनी केलेले वक्तव्य याविरुद्ध ब्रिजेश कलापा या वकिलाने याचिका दाखल केली आहे. सदर याचिकेत राज आणि उद्धव ठाकरे यांना प्रतिवादी करण्यात आले असले तरी केवळ निवडणूक आयोगालाच नोटीस पाठविण्यात आली आहे. ब्रिजेश कलापा यांनी स्वत: या प्रकरणी युक्तिवाद केला. आंध्र प्रदेशातील मजलिस-ए-इत्तेहदूल मुस्लिमीन पक्षाचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी केलेल्या प्रक्षोभक भाषणाचाही कलापा यांनी संदर्भ दिला आहे.

Story img Loader