ताजमहाल परिसरातील बहुस्तरीय मोटार पार्किंग पाडून टाकण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. आग्रा येथे ताजमहाल नजीक हे पार्किंग आहे. सर्वोच्च न्यायालयाने अधिकाऱ्यांना जैसे थे परिस्थिती ठेवण्याचा आदेश दिला असून हे पार्किंग सतराव्या शतकातील महत्त्वाचे ठिकाण असलेल्या ताजमहालच्या पूर्व दरवाजापासून एक कि.मी. अंतरावर आहे. या पार्किंगचे पुढील बांधकाम मात्र थांबवण्यात यावे, असा आदेश देण्यात आला आहे.
न्या. एम.बी.लोकूर व न्या. दीपक गुप्ता यांनी अतिरिक्त सरकारी वकील तुषार मेहता यांना सांगितले, की ताज ट्रॅपिझियम झोन व आजूबाजूच्या भागांच्या संरक्षणाबाबतचे सर्वसमावेशक धोरण नेमके काय आहे ते उत्तर प्रदेश सरकारने सांगावे. ताज ट्रॅपिझियम झोन हा ताजमहाल भोवतीचा १०४०० चौरस किमीचा परिसर असून तो ऐतिहासिक ताजमहालचे रक्षण करण्यासाठी आहे. मेहता यांनी न्यायालयाला सांगितले, की ताज महालचे रक्षण करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत. याबाबतचे सर्वंकष धोरण न्यायालयाला सादर करण्यात येईल. न्यायालयाने याप्रकरणी आता पुढील सुनावणी १५ नोव्हेंबरला ठेवली आहे. सर्वोच्च न्यायालयाने २४ ऑक्टोबरला बहुमजली मोटार पार्किग पाडून टाकण्याचा आदेश दिला होता.
पर्यावरणतज्ज्ञ एम.सी.मेहता यांनी याबाबत याचिका दाखल केली होती. ताज महालचे संरक्षण व विकास कार्यक्रमात सर्वोच्च न्यायालयाने लक्ष घातले आहे. मेहता यांनी याचिकेत म्हटले आहेत की, ताजमहालचे विषारी वायू व जंगलतोडीपासून संरक्षण करावे. ताजमहालच्या रक्षणासाठी न्यायालयाने काही उपाययोजनाही जाहीर केल्या होत्या.