देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या(जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कूमार याला बुधवारी दुपारी पतियाळा कोर्टासमोर हजर करण्यात आले. कोर्टाने कन्हैय्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून, पुढील सुनावणी २ मार्च रोजी होणार आहे. दरम्यान, कन्हैय्याला कोर्टात हजर करण्याआधी कोर्टाच्या बाहेर वकिलांच्या एका गटाने त्याला मारहाण केल्याचा प्रकार घडला. सकाळपासूनच पतियाळा हाऊस कोर्टाबाहेर वातावरण तापले होते. कोर्टाबाहेर पत्रकार आणि विद्यार्थ्यांना वकिलांनी मारहाण केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने याची दखल घेऊन कन्हैय्या कुमारला कोर्टात सादर करतेवेळी त्याच्यासह त्याच्या वकिलांची आणि पत्रकारांच्या सुरक्षेबाबत सतर्क राहण्याचे आदेश दिले होते. याशिवाय, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानेही गृहसचिव, मुख्य सचिव आणि दिल्ली पोलीस आयुक्तांना नोटीस बजावली होती. तरीसुद्धा कन्हैय्या कोर्ट परिसरात दाखल झाल्यानंतर वकिलांच्या एका गटाने आक्रमक होऊन त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. यात कन्हैय्याच्या गटाचे काही समर्थक जखमी झाल्याचे समजते. पोलिसांनी मोठ्य़ा शर्थीने कन्हैय्याला कोर्टासमोर हजर केले. त्यानंतर झालेल्या सुनावणीत कोर्टाने कन्हैयाची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
कन्हैय्या कुमारला पतियाळा कोर्टाबाहेर वकिलांकडून मारहाण, १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
सकाळपासूनच पतियाळा हाऊस कोर्टाबाहेर वातावरण तापले होते.
Written by लोकसत्ता टीमविश्वनाथ गरुड
Updated:
First published on: 17-02-2016 at 15:18 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sc summons delhi police counsel after fresh violence outside patiala court