गुंतवणूकदारांचे पैसे परत न दिल्याप्रकरणी सहारा उद्योगसमुहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांना सर्वोच्च न्यायालयाने समन्स बजावले आहे. यापूर्वी न्यायालयाने दिलेल्या आदेशांना केराची टोपली दाखवणा-या सहारा समुहाच्या संचालक मंडळाला स्पष्टीकरण देण्यासाठी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायालयात हजर राहण्याची सक्ती करण्यात येऊ नये, या संदर्भातील सुब्रतो राय यांच्या वकिलाची याचिका फेटाळत न्या. के. एस. राधाकृष्णन आणि न्या. जे. एस. केहार यांच्या पीठाने २६ फेब्रुवारी रोजी सुब्रतो राय यांना स्वतः न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशांना न जुमानण्याचा हा प्रकार गेल्या दोन वर्षांपासून सुब्रतो राय यांच्याकडून सुरू आहे. त्यामुळे सर्व आरोपींनी खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायालयात हजर राहावे, म्हणजे न्यायालयात काय घडते याबद्दल तुम्हाला समजेल, असे न्यायालयाने सांगितले. सहारा समुहाने कर्जरोख्यांच्या माध्यमातून अनधिकृतरित्या पैसा उभारला होता. गुंतवणूकदारांकडून उभारण्यात आलेल्या तब्बल २४,००० कोटींच्या रकमेची परतफेड करण्यात सहारा उद्योगसमुहाकडून टाळाटाळ केली जात असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sc summons sahara chief subrata roy over refund of money to investors