भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सर्वसाधारण सभेमध्ये तामिळनाडू क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष म्हणून एन. श्रीनिवासन सहभाग घेऊ शकतात का, यावर कायदेशीर स्पष्टता द्यावी, या मागणीसाठी करण्यात आलेली बीसीसीआयची याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दाखल करून घेतली. त्यावर लवकरच सुनावणी घेण्यात येईल, असे न्यायमूर्ती टी. एस. ठाकूर यांच्या नेतृत्त्वाखालील खंडपीठाने म्हटले आहे.
याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी घ्यावी, अशी मागणी बीसीसीआयचे वकील के. के. वेणूगोपाल यांनी न्यायालयाकडे केली. २२ जानेवारी रोजी दिलेल्या आदेशात सर्वोच्च न्यायालयाने एन. श्रीनिवासन यांना बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यास बंदी घातली आहे. चेन्नई सुपरकिंग्जची मालकी श्रीनिवासन यांच्याकडे असल्यामुळे त्यांच्यावर ही बंदी घालण्यात आली आहे. या बंदीच्या पार्श्वभूमीवर श्रीनिवासन यांनी बीसीसीआयच्या बैठकीला उपस्थित राहता येईल की नाही, याबाबत कायदेशीर स्पष्टता द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. २८ ऑगस्ट रोजी बीसीसीआयच्या महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीतील श्रीनिवासन यांच्या उपस्थितीवरून अनेक सदस्यांनी आक्षेप घेतले होते. त्यामुळे ही बैठकच तहकूब करण्यात आली होती.

Story img Loader