लेफ्टनंट जनरल दलबीर सिंग सुहाग यांची नियोजित लष्करप्रमुख म्हणून केलेल्या निवडीला स्थगिती देण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर जुलै महिन्यात सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी होकार दिला.
लेफ्टनंट जनरल रवि दास्ताने यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने सप्टेंबरमध्ये सुनावणी घेण्याचे निश्चित केले होते. मात्र, दास्ताने ३१ ऑगस्ट रोजी निवृत्त होत आहेत. त्याचवेळी सुहाग हे १ ऑगस्ट रोजी लष्करप्रमुख पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. या पार्श्वभूमीवर लवकरात लवकर सुनावणी घेण्याची विनंती दास्ताने यांच्या वकिलांनी केली. सुटीच्या काळातील न्यायालयाच्या पीठाचे न्या. विक्रमजीत सेन यांनी दास्ताने यांच्या याचिकेची सुनावणी जुलैमध्ये घेण्याचे निश्चित केले.
याचिकेमध्ये सुहाग यांची लष्करप्रमुख म्हणून निवड करण्याला आव्हान देण्यात आले आहे. जर ही निवडच न्यायालयाने रद्द ठरविली तर त्यांची नियुक्तीही रद्द होईल, असे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सांगितले. जुलैच्या दुसऱया आठवड्यात या याचिकेवर सुनावणी घेण्यात येणार आहे.
सध्याचे लष्करप्रमुख विक्रम सिंग ३१ जुलै रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे मावळत्या यूपीए सरकारने सुहाग यांची नियोजित लष्करप्रमुख म्हणून निवड केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा