उल्हासनगरचा माजी आमदार आणि नगरसेवक सुरेश बुधरमल ऊर्फ पप्पू कलानी याच्या जन्मठेपेच्या शिक्षेवर मुंबई उच्च न्यायालयापाठोपाठ सर्वोच्च न्यायालयानेही मंगळवारी शिक्कामोर्तब केले. उच्च न्यायालयाकडून जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवण्यात आल्यानंतर पप्पू कलानीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत पुर्नविचार याचिका दाखल केली होती. अखेर ही याचिका फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयानेही पप्पू कलानीची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे.
यापूर्वी, कल्याण सत्र न्यायालयाने इंदर भटिजा हत्या प्रकरणात पप्पूला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्या विरोधात त्याने उच्च न्यायालयात अपील केले होते. या हत्येशी आपला थेट संबंध असल्याचा वा खुनाच्या कटात आपला सहभाग असल्याचा कुठलाही पुरावा पोलिसांतर्फे सादर करण्यात आलेला नाही, असा दावा करीत त्याने कल्याण सत्र न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले होते. कनिष्ठ न्यायालयाने त्यांना कटकारस्थानाच्या आरोपात दोषी ठरविण्यात काहीही चूक केलेली नसल्याचे स्पष्ट करीत खंडपीठाने कलानीसह बच्ची पांडे, बाबा ग्रॅबिएल आणि मोहम्मद असरत या तिघांचे अपील फेटाळून लावत त्यांची शिक्षा कायम ठेवली.
२७ फेब्रुवारी १९९० रोजी घन:श्याम भटिजा यांची उल्हासनगर येथील पिंटो रिसोर्टजवळ हत्या झाली होती. या हत्येचा साक्षीदार असलेला भटिजाचा भाऊ इंदर याचीही पोलीस संरक्षण असताना २८ एप्रिल १९९० रोजी हत्या झाली होती. राजकीय शत्रुत्वातून भटिजा बंधूंची हत्या करण्यात आल्याचा आरोप पोलिसांनी याप्रकरणी कलानी, बच्ची पांडे, बाबा ग्रॅबिएल आणि मोहम्मद असरत, डॉ. नरेंद्र रामसिंघानी आणि रिचर्ड यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते.
पप्पू कलानीची जन्मठेप सर्वोच्च न्यायालयाकडूनही कायम
उल्हासनगरचा माजी आमदार आणि नगरसेवक सुरेश बुधरमल ऊर्फ पप्पू कलानी याच्या जन्मठेपेच्या शिक्षेवर मुंबई उच्च न्यायालयापाठोपाठ सर्वोच्च न्यायालयानेही मंगळवारी शिक्कामोर्तब केले.
First published on: 05-05-2015 at 06:37 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sc upholds life sentence awarded to gangster turned politician pappu kalani