कोविड काळात महाविकास आघाडी सरकारने प्रचंड घोटाळे केल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात केले. यावरून संजय राऊतांनी आता पलटवार केला आहे. शिंदे गटाचे आमदार चिमण आबा पाटील यांनी गुलाबराव पाटलांच्या गैरव्यवहाराबाबत पत्र लिहिलं आहे. या पत्राची चौकशी करण्याचे आवाहन संजय राऊतांनी दिलं. ते आज दिल्लीत माध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, खोटारडे राज्यकर्ते महाराष्ट्रात राज्य करत आहेत. ज्यांनी मुंबईत सर्वाधिक टेंडरबाजी केली, ते आमदार आणि स्थायी समितीचे अध्यक्ष त्यांच्या मागेच बसले होते. ज्यांनी कोविड काळात घोटाळे केले असा आरोप आहे ते सगळे टेंडरबाज लोक शिंदे गटात आहेत. आपण कोणाविषयी बोलतो याचं भान मुख्यमंत्र्यांना नसेल.
हेही वाचा >> मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना उत्तर, “आम्ही घरात बसून कुणालाही.. “
“जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावमध्ये कोविड औषध खरेदीसह अनेक विषयांत केलेल्या कोट्यवधींच्या घोटाळ्यांची चौकशी करावी असं शिंदे गटातील आमदार चिमण आबा पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आहे की नाही हे स्पष्ट करावं. हे पत्र माझ्याकडे आहे. यासंदर्भात संबंधित व्यक्तीशी माझं बोलणं झालं आहे”, असं संजय राऊत म्हणाले.
“हा २७ कोटींचा घोटाळा आहे. या घोटाळ्यात तत्कालीन सीव्हिल सर्जनना निलंबित करण्यात आले. त्यांचे सर्व धागेदोरे गुलाबराव पाटलांपर्यंत पोहोचतात. हे त्यांच्या पक्षातील फुटीर आमदार चिमण आबा पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे कळवले आहे. हेच लोक तुमच्या आजूबाजूला मांडीवर बसले आहेत. त्यामुळे तुमची मांडी चेपली आहे. चिमण आबा पाटील यांनी केलेल्या तक्रारीची चौकशी करा. मग मुंबई महापालिकेतील घोटाळ्यांवर या. महापालिकेत नक्की काय घडलं, कोणामुळे घडलं, घडवणारे तुमच्या आजूबाजूला बसले आहेत. त्यांना तुम्ही कसं अभय दिलंय आणि त्यांना वाचवण्याकरता कसे आरोप करत आहात, हे आम्ही सादर करू”, असं आव्हानही राऊतांनी दिलं.