मध्य प्रदेशातील दमोह जिल्ह्यातील एका खासगी शाळेत हिजाबसारखा गणवेश विद्यार्थींनींना दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मध्य प्रदेश सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
यापूर्वी दमोह जिल्ह्यातील गंगा जमुना उच्च माध्यमिक विद्यालयाच्या पोस्टरमध्ये हिंदू विद्यार्थीनींनी हिजाबसारखे दिसणारे स्कार्फ घातला होता. यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी भोपाळमध्ये पत्रकारांना सांगितले की, “या प्रकरणाची प्रथम जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी चौकशी केली होती. यासंदर्भात कोणतीही तक्रार आलेली नाही. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधिक्षकांना याची सखोल चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.”
दरम्यान, हिंदू संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करत शाळेची नोंदणी रद्द करण्याची मागणी केली. शाळा हिंदू विद्यार्थिनींना हिजाब घालण्यास भाग पाडत असल्याचा आरोप त्यांनी केला.
दमोहचे जिल्हाधिकारी मयंक अग्रवाल म्हणाले की, “यापूर्वी केलेल्या तपासणीत धर्मांतराचा दावा खोटा असल्याचे आढळून आले होते. गृहमंत्र्यांच्या सूचनेनंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक पथक तयार करण्यात येत आहे.”
एनसीपीसीआरचे अध्यक्ष प्रियांक कानूनगो यांनी ट्विट करत म्हणाले की, “याबाबत दखल घेतली जात आहे आणि आवश्यक कारवाईसाठी दमोहचे जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना सूचना पाठवल्या जात आहेत.”