हरियाणाच्या महेंद्रगड जिल्ह्यातील कनिना गावाजवळ शाळेच्या बसला भीषण अपघात झाला आहे. गुरुवारी सकाळी ही घटना घडली. या अपघातात पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू , तर १५ विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
‘द इंडियन एक्सप्रेस’ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, ही बस महेंद्रगडमधील जीआरएल शाळेची आहे. ही बस सकाळी विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जात होती. यावेळी ओव्हरेटक करण्याच्या प्रयत्नात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ही बस उलटली.
हेही वाचा – अरविंद केजरीवालांचे वजन घटले नाही, तर १ किलो वाढले? भाजपा नेत्याच्या दाव्याने चर्चांना उधाण!
या अपघातात पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर १५ विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना तत्काळ जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या बसमध्ये १०व्या वर्गात शिकणारे एकूण ३५ ते ४० विद्यार्थी असल्याचे सांगितलं जात आहे.
दरम्यान, माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला आहे. अद्याप विद्यार्थ्यांची ओळख पटलेली नाही. या अपघातात बसचालकही जखमी झाला, अशी माहिती आहे.