Crime News Child Murdered After Rape Attempt in Gujarat: अवघ्या सहा वर्षांच्या पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या एका चिमुकलीची तिच्या शाळेच्या मुख्याध्यापकानं गळा दाबून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुजरातच्या दाहोद जिल्ह्यातील ही घटना आहे. या मुख्याध्यापकानं त्याच्या कारमध्येच मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. पण मुलीनं आरडाओरडा केल्यानंतर तिला गप्प करण्यासाठी मुख्याध्यापकानं तिची गळा दाबून हत्या केली. नंतर शाळेच्याच मागच्या बाजूला तिचा मृतदेह फेकून दिल्याचा घटनाक्रम पोलीस तपासात उघड झाला आहे.

इंडियन एक्स्प्रेसनं पोलिसांच्या माहितीनुसार दिलेल्या वृत्तामध्ये या घटनेचा संपूर्ण घटनाक्रम नमूद करण्यात आला आहे. त्यानुसार, गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे मुलीला शाळेत सोडण्यासाठी या चिमुकलीची आई तिला घेऊन निघाली असता शाळेचा मुख्याध्यापक त्याच्या गाडीतून शाळेत जात होता. तेव्हा मुलीला आपण सोडतो, असं म्हणून त्यानं त्या चिमुकलीला कारमध्ये बसवलं. आईनंही विश्वासानं मुलीला मुख्याध्यापकासोबत पाठवलं.

रस्त्यात अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

दरम्यान, मुख्याध्यापकानं वाटेतच कारमध्ये त्या चिमुकलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पण मुलीनं विरोध करत आरडाओरड करायला सुरुवात केली. ते पाहून तिला गप्प करण्यासाठी नराधम मुख्याध्यापकानं त्या चिमुकलीची गळा दाबून हत्या केली.

Crime News: महिलेची हत्या करून मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवले, बंगळुरूमध्ये धक्कादायक घटना; महिलेची आई म्हणाली, “घरमालकाने…”

धक्कादायक बाब म्हणजे या नराधमानं दिवसभर त्या चिमुकलीचा मृतदेह आपल्या गाडीतच ठेवला. शाळेत पोहोचल्यावर दिवसभर त्यानं त्याची नेहमीची कामंही केली. शाळा सुटल्यानंतर त्यानं मुलीच्या चपला आणि दप्तर अनुक्रमे वर्गाच्या बाहेर आणि वर्गामध्ये बाकावर ठेवलं. नंतर मुलीचा मृतदेह शाळेच्या मागच्या बाजूला फेकून दिला.

…आणि पोलीस तपास सुरू झाला!

मुलगी शाळा सुटूनही घरी न आल्यामुळे हवालदील झालेल्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीनं तपास सुरू केला.यासंदर्भात दाहोदचे पोलीस अधीक्षक राजदीपसिंह झाला यांनी सविस्तर माहिती दिली आहे. “या प्रकरणाची १० वेगवेगळ्या पोलीस पथकांनी सविस्तर चौकशी केल्यानंतर काही बाबी आम्हाला स्पष्ट झाल्या. यानुसार, ती मुलगी शेवटची शाळेच्या मुख्याध्यापकासोबतच दिसली होती हे नक्की होतं. तिच्या आईनं तिला सकाळी १० वाजून २० मिनिटांनी मुख्याध्यापकासोबत पाठवलं. पण इतर विद्यार्थी आणि शिक्षकांच्या जबानीनुसार गुरुवारी ती मुलगी शाळेत आलीच नाही”, असं झाला म्हणाले.

महिलांवरील अत्याचाराच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. (सांकेतिक छायाचित्र)

“सुरुवातीला मुख्याध्यापकानं सांगितलं की शाळेत सोडल्यानंतर मुलगी कुठे गेली हे त्याला माहितीच नाही. पण नंतर त्यानं गुन्ह्याची कबुली दिली”, असंही झाला यांनी सांगितलं.

पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

दरम्यान, या नराधम मुख्याध्यापकानं पोलिसांची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न केला. त्यानं पोलिसांना सांगितलं की शाळेतल्या एका शिक्षकाचा त्याला संध्याकाळी फोन आला होता. मुलगी बेपत्ता झाल्याचं त्यानंच आपल्याला सांगितलं असा दावा मुख्याध्यापकानं केला. पण पोलिसांनी त्याच्या फोनचे दिवसभरातले लोकेशन तपासल्यानंतर खरा प्रकार उघड झाला.

“शाळा सुटल्यानंतर तो कधी निघाला या वेळेवरून आम्हाला शंका आली की काहीतरी गडबड आहे. आमच्या चौकशीमध्ये त्यानं नंतर कबूल केलं की शाळेत जातानाच कारमध्ये मुलीवर अतिप्रसंग करण्याचा त्यानं प्रयत्न केला होता. पण मुलीनं विरोध करून आरडाओरड सुरू केल्यामुळे तिला शांत करण्यासाठी त्यानं तिची हत्या केली. त्यानंतर तो शाळेत जाऊन दिवसभराची कामं करत राहिला”, अशी माहिती झाला यांनी दिली.

शाळेत उशीरा पोहोचल्याने संशय बळवला

दरम्यान, आरोपी मुख्याध्यापकाला त्या दिवशी शाळेत पोहोचायला नेहमीपेक्षा जास्त उशीर लागल्याचं लक्षात आल्यामुळेही पोलिसांचा संशय बळावला. दिवसभर मुलगी शाळेतही नव्हती आणि शाळेच्या मागच्या बाजूला तिचा मृतदेहही दिसला नाही असं शाळेतील चौकशीवरून पोलिसांना समजलं. पण एका विद्यार्थ्यानं पोलिसांना सांगितलं की मुलीच्या चपला त्यानं मुख्याध्यापकाच्या कारमध्ये पाहिल्या होत्या. शिवाय, आरोपी मुख्याध्यापक त्या दिवशी सगळ्यांच्या नंतर शाळेतून निघाला, असंही पोलिस तपासात उघड झालं होतं.