आध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांना जामीन मंजूर करण्यात यावा, असे ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांनी सुचवले आहे. तसेच आसाराम यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणारी मुलगीच ‘मनोरुग्ण’ असल्याचा दावा करीत त्यांनी खळबळ उडवून दिली आहे. न्यायालयाने मात्र आसाराम बापू यांच्या पोलीस कोठडीत वाढ करीत त्यांना ३० सप्टेंबपर्यंत पोलीस कोठडी फर्मावली आहे. दरम्यान, आसाराम बापू यांनी आपल्याला दोषी सिद्ध करू शकणाऱ्या व्यक्तीस पाच लाख रुपयांचे इनाम जाहीर केले आहे.
सदर मुलीचे वय तिच्या मूळगावी असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेकडून तपासण्यात यावे. तिने जिथे आपले शिक्षण पूर्ण केले त्या चिन्नदवारा गुरुकुल येथील तपशिलावरून तिला अल्पवयीन ठरविण्याची घाई करू नये, असे जेठमलानी यांनी म्हटले आहे. वयाची खातरजमा केल्यास सदर मुलगी अल्पवयीन नसल्याचे स्पष्ट होईल आणि त्या दोहोंमधील संबंध हे परस्परसहमतीतून झाल्याचे आपल्याला आढळेल, असा दावा जेठमलानी यांनी केला. त्यांनी सदर मुलीवर ती मनोरुग्ण असल्याचा थेट आरोप केला नसला तरीही, त्यांनी ‘पुरुषाला एकांतात भेटण्यास आसुसलेली’ अशीच तिची मानसिक अवस्था असल्याची मुक्ताफळे त्यांनी उधळली. या मुलीवर जर खरोखरीच लैंगिक अत्याचार झाले असे मानायचे म्हटले तरी एक सवाल उपस्थित होतोच की, जेव्हा ती मुलगी मदतीसाठी आक्रोश करीत होती तेव्हा आसारामांच्या खोलीबाहेर तिची आई आणि एक मदतनीस शांतपणे कसे काय उभे राहू शकले, अशी पृच्छा जेठमलानींनी केली.

Story img Loader