सध्या देशभरात ‘वंदे मारतरम’च्या सक्तीवरून वातावरण तापले असतानाच भाजप खासदार विनय कटियार यांनी वादग्रस्त विधान करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. देशातील सर्व शाळा आणि मदरशांमध्ये राष्ट्रगीत गायलेच पाहिजे. या सर्व ठिकाणी राष्ट्रध्वजही फडकावण्यात आला पाहिजे. ज्या लोकांना हे सर्व मान्य नसेल त्यांना सरळ देशद्रोही घोषित करायला पाहिजे, असे कटियार यांनी म्हटले. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ सरकारने स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व मदरशांमध्ये राष्ट्रगीत गाणे आणि ध्वजवंदन बंधनकारक केले आहे. तसेच स्वातंत्र्यलढ्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात यावी, असे आदेशही सरकारने मदरशांना दिले आहेत. सरकारकडून स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी होणाऱ्या सर्व कार्यक्रमांचे चित्रीकरण केले जाईल. सरकारच्या या निर्णयावर काहीजणांनी टीका केली आहे. मात्र, या कार्यक्रमांचे चित्रीकरण केल्यास यापैकी चांगल्या कार्यक्रमांपासून आदर्श घेता येईल, असा युक्तिवाद सरकारने केला आहे.

उत्तर प्रदेशात स्वातंत्र्यदिनी मदरशांना असे आदेश पहिल्यांदाच देण्यात आले आहेत. योगी सरकारच्या मदरसा परिषदेनं दिलेल्या या आदेशामुळे नवा वाद ओढवण्याची शक्यता आहे कारण अशाप्रकारचे आदेश लागू करणं म्हणजे आमच्या देशभक्तीवर संशय व्यक्त करण्याचा प्रकार आहे अशी प्रतिक्रिया मदरसा संचालकांनी दिली आहे. उत्तर प्रदेशातल्या मदरसा परिषदेनं हे आदेश ३ ऑगस्ट रोजीच लागू केले आहेत. या कार्यक्रमाचं व्हिडिओ चित्रण आणि फोटो काढणं बंधनकारक करण्यात आलं आहे.