जम्मू-काश्मीरच्या दोडा जिल्ह्य़ात एका शाळेच्या मुख्याध्यापिकेने मुलाच्या विवाह समारंभासाठी शाळेला सुटी जाहीर केल्याने त्या मुख्याध्यापिकेसह सर्व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

दोडा जिल्ह्य़ातील भागला येथील सरकारी शाळेच्या सर्व कर्मचाऱ्यांना आम्ही निलंबित केले आहे. शाळेच्या मुख्याध्यापिकेच्या मुलाच्या विवाहानिमित्त मंगळवारी शाळेला सुटी जाहीर करण्यात आली होती, असे जम्मूच्या शिक्षण संचालक समिता सेठी यांनी सांगितले.

संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतीही पूर्वपरवानगी न घेताच मुख्याध्यापिका सईदा अंजूम यांनी मंगळवारी शाळेला सुटी जाहीर केली, अत्यंत दुर्गम भागातील ३०० विद्यार्थी या शाळेत शिकत आहेत. आपल्या मुलाच्या विवाहानिमित्त मुख्याध्यापिकांनी सूचना फलकावर आपल्या सहीनिशी शाळेला सुटी दिल्याची सूचना लावल्याचा प्रकार गावच्या सरपंचांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी राज्याचे शिक्षणमंत्री नईम अख्तर यांच्याशी संपर्क साधला, त्यानंतर मंत्र्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. या प्रकाराची आम्हाला माहिती मिळताच चौकशीचे आदेश देण्यात आले आणि शिक्षण विभागाच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांना त्याच दिवशी शाळेत पाठविण्यात आले. त्यांना शाळा बंद असल्याचे आणि बंदची सूचना लावण्यात आल्याचे आढळले, असे सेठी म्हणाल्या. या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीत शाळेच्या मुख्याध्यापिका, प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना दोषी ठरवून त्यानंतर निलंबित करण्यात आले.

Story img Loader