एका मानवाने दुसऱ्या मानवाच्या मेंदूशी संपर्क साधून त्याच्या हालचाली इंटरनेटच्या माध्यमातून नियंत्रित करण्याचा प्रयोग जगात प्रथमच यशस्वी करण्यात आला असून, त्यात एका भारतीय वैज्ञानिकाचा समावेश आहे. वॉशिंग्टन विद्यापीठातील प्राध्यापक राजेश राव यांनी त्यांचे सहकारी अँड्रिया स्टॉको यांना मेंदू संदेश पाठवला, त्यामुळे स्टॉक यांची बोटे संगणकाच्या कळफलकावर चालू लागली. यात इलेक्ट्रिकल ब्रेन रेकॉर्डिग तसेच चुंबकीय उत्प्रेरणेचा वापर करण्यात आला आहे.
डय़ुक विद्यापीठाच्या संशोधकांनी दोन उंदरांवर मेंदू-मेंदू संदेशवहनाचा प्रयोग केला होता. हार्वर्ड विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी मानव-उंदीर यांच्यात मेंदू पातळीवर संपर्क घडवून आणला होता. मानव-मानव मेंदू संपर्क इंटरनेटच्या माध्यमातून प्रस्थापित केला जाण्याची ही पहिलीच वेळ आहे असा दावा राव व स्टॉको यांनी केला आहे. इंटरनेटच्या माध्यमातून संगणकाचे जाळे जोडलेले असते. आता इंटरनेटच्या माध्यमातून मेंदू जोडले जाऊ शकतील. एका व्यक्तीला एखाद्या बाबीचे असलेले ज्ञान आता अशा मेंदू-मेंदू पातळीवरील जोडणीने आदान-प्रदान केले जाऊ शकते, असे वॉशिंग्टन विद्यापीठातील मानसशास्त्राचे सहायक प्राध्यापक स्टॉक यांनी सांगितले.
राव यांनी सांगितले, की माझ्या मेंदूतील संदेशानुसार दुसरीकडे बसलेल्या स्टॉको यांच्या मेंदूने प्रत्यक्ष कृती केली. एकप्रकारे माझ्या मेंदूकडून त्यांच्या मेंदूकडे एका दिशेने झालेले हे संदेशवहन होते. आता दोन मेंदूत द्विमार्गी संदेशवहन घडवून आणणे ही पुढची पायरी असेल. हे खरे असले तरी मेंदूतील काही संदेशच यात आदानप्रदान केले जाऊ शकतील म्हणजेच विचारांच्या पातळीवर असे आदानप्रदान तंत्रज्ञानाच्या मदतीने शक्य नाही. शिवाय एखाद्या व्यक्तीला तुमच्या मेंदूचा कब्जा घेऊन तुमच्या हालचालींचे नियंत्रण अर्निबधपणे करता येईल असेही नाही.
प्रयोगात काय घडले
स्टॉको हे स्वीम कॅप घालून प्रयोगशाळेत उपस्थित होते. चुंबकीय उत्प्रेरणा देणारे चुंबकीय वेटोळे त्यांच्या डाव्या मोटर कॉर्टेक्स या मेंदूतील भागावर ठेवण्यात आले होते. हा भाग मानवी हालचालींचे नियंत्रण करीत असतो. राव व स्टॉको यांच्या दोन प्रयोगशाळांमध्ये स्काइपच्या माध्यमातून संपर्क होता. पण या दोघांनाही स्काइपचा पडदा मात्र दिसत नव्हता. राव यांनी त्यांच्या बाजूने संगणकाच्या पडद्याकडे बघून त्यांनी मनाने एक व्हिडिओ गेम खेळण्यास सुरुवात केली. जेव्हा त्यांना लक्ष्यावर तोफगोळा टाकावा असे वाटत होते तेव्हा त्यांनी आपला उजवा हात हलतो आहे व कर्सर फायर बटनावर क्लिक होईल अशी फक्त कल्पना केली. प्रत्यक्ष हात हलवला नाही. दुसरीकडे स्टॉको यांनी ध्वनीच्या रूपातील गोंगाट नष्ट करणारे इयर बड्स घातलेले होते. ज्या वेळी इकडे राव यांनी कर्सरच्या मदतीने फायर बटन दाबण्याची कल्पना केली त्या वेळी तिकडे स्टॉको यांचा हात त्यांच्या इच्छेविरुद्ध हलला व उजव्या हाताच्या बोटाने स्पेस बार दाबला गेला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा