गेल्या काही दिवसांपासून देशातील असहिष्णू वातावारणाचा निषेध म्हणून लेखक आणि कलाकारांकडून सुरू असणाऱ्या ‘पुरस्कार वापसी’ आंदोलनात आता शास्त्रज्ञही सहभागी झाले आहेत. देशातील बुद्धिप्रामाण्यावाद, तर्क आणि विज्ञानाच्या सरकारी गळचेपीचा निषेध म्हणून ज्येष्ठ शास्त्रज्ञ पी.एम. भार्गव यांनी त्यांना मिळालेला पद्मभूषण पुरस्कार सरकारला परत करण्याची घोषणा केली. भार्गव हे भारतातील पेशीय आणि आण्विक जीवशास्त्र केंद्राचे (सीसीएमबी) संस्थापक संचालक आहेत. मोदी सरकार देशामध्ये जातीय आणि धर्माच्या आधारावर फूट पाडणाऱ्या गटांना मोकळीक देत असल्याचा आरोप भार्गव यांनी यावेळी केला. एखादा कलाकार त्याच्या कलेच्या माध्यमातून निषेध व्यक्त करू शकतो. मात्र, मी वैज्ञानिक आहे. मी माझा निषेध कसा व्यक्त करणार?, त्यामुळेच मी मला मिळालेला पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतल्याचे पी.एम. भार्गव यांनी सांगितले. त्यासाठी ते लवकरच केंद्रीय गृहसचिवांची भेट घेणार आहेत.
१२ दिग्दर्शकांकडून राष्ट्रीय पुरस्कार परत
फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’ (एफटीआयआय)च्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतल्यामुळे केंद्र सरकारला काहीसा दिलासा मिळाला असला तरी देशातील १२ दिग्दर्शकांनी राष्ट्रीय पुरस्कार परत करण्याची घोषणा केल्यामुळे सरकारच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. एफटीआयआयचा न सुटलेला तिढा आणि देशातील वाढत्या असहिष्णुतेचे कारण देत या दिग्दर्शकांना आपापले पुरस्कार परत करण्याची घोषणा केली. पुरस्कार परत करणाऱ्यांमध्ये दिबाकर बॅनर्जी, आनंद पटवर्धन, परेश कामदार, निशिता जैन, किर्ती नाखवा, हर्षवर्धन कुलकर्णी, हरी नायर, राकेश शर्मा, इंद्रनील लहरी आणि लिपिका सिंग दराई या दिग्दर्शकांचा समावेश आहे.