देशातील सामाजिक-राजकीय परिस्थिती अयोग्य असल्याबाबत नाराजी
येथील सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायॉलॉजी या संस्थेचे संस्थापक संचालक व ख्यातनाम वैज्ञानिक पी.एम.भार्गव यांनी त्यांना १९८६ मध्ये मिळालेला पद्मभूषण किताब राष्ट्रपतींना परत केला आहे. केंद्रातील भाजप सरकार देशाला ज्या दिशेने नेत आहे त्याच्या निषेधार्थ त्यांनी पद्मभूषण परत केले.
६ नोव्हेंबरलाच त्यांनी हा नागरी सन्मान परत केला असून त्यांनी राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मला त्यावेळचे राष्ट्रपती ग्यानी झैलसिंह यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला होता, पण खेदाने तो परत करण्याचा निर्णय मी घेतला आहे. सध्या देशातील राजकीय-सामाजिक स्थिती योग्य नाही. केंद्र व अनेक राज्यांत भाजप सत्तेवर आहे. त्या पक्षाने लोकशाहीचा मार्ग सोडून दिला आहे. ते देशाला िहदू एकाधिकारशाहीकडे नेत आहेत. पाकिस्तान जसा इस्लामी देश आहे तसे त्यांना भारत हा हिंदू देश करायचा आहे. भाजप हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा राजकीय पक्ष आहे, संघाच्या नेतृत्वाखाली त्यांचे काम चालते, त्यांची विचारसरणी हिंदुत्वाची आहे पण ती विभाजनवादी, अयोग्य व अवैज्ञानिक आहे. राज्यघटनेच्या कलम ५१ ए (एच) अन्वये वैज्ञानिक दृष्टिकोन जपणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजप हे दोन्ही वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या विरूद्ध काम करीत आहेत. सरसंघचालक मोहन भागवत यांनी विवाह हे एक कंत्राट असून महिलेने गृहिणी रहावे व बाहेर जाऊ नये असे म्हटले होते. दादरी घटनेत महंमद अखलाख याला ठार मारण्यात आले ते नियोजनबद्ध होते, कुणी काय खावे यावरही भाजप नियंत्रण ठेवू पाहत आहे, कुणी काय वाचावे, कुणी कुणावर प्रेम करावे, काय पेहराव असावा यावरही ते नियंत्रण आणू पाहत आहेत. चरकसंहितेत म्हटल्याप्रमाणे गायीचे मांस हे मानवी शरीरात वात जास्त झाल्यास किंवा अनियमित ताप येत असल्यास, कोरडा खोकला किंवा इतर कारणांसाठी उपयुक्त आहे. देशात लोकशाही कमी व असहिष्णुता वाढत आहे. अल्पसंख्याकांना दुय्यम वागणूक दिली जात आहे. देशात हिंदुत्वाचा कार्यक्रम लादला जात आहे. सध्याच्या सरकारमध्ये सांस्कृतिक एकाधिकारशाही दिसते आहे. सध्याच्या सरकारला कशाचेच ज्ञान नाही, त्यांना विज्ञानाशी देणेघेणे नाही. विज्ञानाच्या व विकासाच्या मार्गात धार्मिक पुराणमतवादाचा अडथळा निर्माण झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा