ग्रहांची निर्मिती कशी झाली, याबाबत खगोल संशोधन जगतात नानाविध कल्पना व प्रमेये मांडली जात असतानाच प्रत्यक्ष ग्रहाची निर्मिती होताना पाहण्याचा योग आता जुळून आला आहे. चिलीतील एका आंतरराष्ट्रीय संशोधकाच्या तुकडीने पृथ्वीपासून ३३५ प्रकाशवर्षे अंतरावरील ‘एचडी १००५४६’ या ताऱ्याभोवती निर्माण होत असलेल्या ग्रहाचे छायाचित्रण करण्यात यश मिळवले आहे.
चिलीत असलेल्या युरोपियन सदर्न ऑब्झव्‍‌र्हेटरीच्या महाकाय दुर्बिणीतून संशोधकांच्या पथकाने हा शोध लावला. सध्या धूलिकण आणि वायूच्या चकतीप्रमाणे दिसणारा हा ग्रह हळूहळू आकार घेईल, असे या संशोधकांनी म्हटले आहे. दुर्बिणीतून अत्यंत स्पष्टपणे दिसणारा हा वायूचा पट्टा एक ग्रहच असून त्याचा आकार गुरूइतका असू शकेल, असे या संशोधकांचे म्हणणे आहे. ‘आम्ही केलेले छायाचित्रण एका ग्रहाच्या निर्मितीचेच असेल तर असा योग इतिहासात पहिल्यांदाच जुळून येईल. यामुळे ग्रहांच्या निर्मितीवस्थेतील वातावरणाचा अभ्यास करणे सहज शक्य होईल,’ असे स्वित्र्झलडमधील ‘ईटीएच’ संस्थेचे प्रमुख संशोधक साशा क्वांझ यांनी सांगितले.
‘एचडी १००५४६’ हा आतापर्यंत अनेकदा संशोधनाचा विषय ठरला आहे. नव्याने निर्माण होत असलेला ग्रह या ताऱ्याच्या बाह्यकक्षेतून त्याला प्रदक्षिणा घालतो. तारा व ग्रह यांच्यातील अंतर पृथ्वी व सूर्यातील अंतराच्या सहापट असावे, असा अंदाज आहे.
असा बनतो ग्रह..
संशोधकांच्या अभ्यासानुसार एखाद्या ताऱ्याची निर्मिती झाल्यानंतर त्याच्यापासून विलग राहिलेले वायू आणि धूलिकण यांच्या एकत्रीकरणातून ग्रहाची निर्मिती होते. सुरुवातीला एखादा पट्टा अथवा धूलिकणांच्या समूहाच्या स्वरूपात असलेल्या या ग्रहाला ताऱ्याभोवती फिरता फिरता आकार येतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा