भार्गव यांच्याकडून पद्मभूषण परत; भाजपची टीका

देशातील असहिष्णू वातावरणाला चपराक लगावण्यासाठी साहित्यिकांपासून सुरू झालेल्या ‘पुरस्कारवापसी’च्या लढय़ात गुरुवारी शास्त्रज्ञ आणि इतिहासकारांनीही उडी घेतली. ज्येष्ठ शास्त्रज्ञ पी. एम. भार्गव यांनी पद्मभूषण किताब परत करण्याचा निर्णय घेतला. मोदी सरकारचा भारताला हिंदू धार्मिक एकतंत्र करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यासोबत देशातील दूषित वातावरणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणतेही आश्वासक निवेदन करीत नसल्याबद्दल रोमिला थापर, इरफान हबीब, के. एन. पण्णीकर आणि मृदुला मुखर्जी यांच्यासह ५३ इतिहासकारांनी निषेध नोंदविला. दरम्यान, भार्गव हे मोदींचा तिरस्कार करणाऱ्या पथकाचे सदस्य असून काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचा जयजयकार करणारे आहेत, असे भाजपने म्हटले.
मतभिन्नता शारीरिक हल्ले करून थांबविली जात आहे, युक्तिवादाला प्रतियुक्तिवादाने नव्हे तर गोळ्यांनी उत्तर दिले जात आहे, असे इतिहासकारांनी एका निवेदनात म्हटले असून दादरी आणि सुधींद्र कुलकर्णी यांच्यावरील हल्ल्याचा संदर्भ दिला आहे.
हैदराबाद येथे अत्यंत प्रतिष्ठेचे केंद्र स्थापन करणारे शास्त्रज्ञ भार्गव यांनी, देशात भीतीचे वातावरण असल्याने आपण पुरस्कार परत करण्याचे ठरविले असल्याचे सांगितले. विविध महत्त्वाच्या पदांवर संघ परिवाराशी संबंधित व्यक्तींच्या नियुक्त्या केल्या जात आहेत, असेही ते म्हणाले. त्यांच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपने म्हटले की, भार्गव यांना गुणवत्तेवर नाही, तर त्यांच्या राजकीय प्रवृत्तीबद्दल उच्चपद देण्यात आले ही वस्तुस्थिती आहे.

‘अ‍ॅवॉर्डवापसी गँग’
एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार परत करणाऱ्या चित्रपट दिग्दर्शकांवर ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी हल्ला चढविला आहे. पुरस्कार परत करण्याचा दिग्दर्शकांचा निर्णय विशिष्ट हेतूचा एक भाग आहे, असे खेर यांनी म्हटले आहे. पुरस्कार परत करणाऱ्या दिग्दर्शकांच्या गटाला खेर यांनी ‘अ‍ॅवॉर्डवापसी गँग’ असे म्हटले आहे.

जे पुरस्कार परत करीत आहेत ते जहाल भाजपविरोधक आहेत. त्यांचे राजकारण सुरू आहे. त्यांनी केलेल्या ट्वीटवर आणि भूमिकेवर नजर टाकली तर ते जहाल भाजपविरोधक असल्याचे स्पष्ट होते, हे घडवून आणलेले बंड आहे.
– अरुण जेटली, केंद्रीय अर्थमंत्री

 

Story img Loader