वैज्ञानिकांनी कोशातून बाहेर येऊन लोकांच्या दैनंदिन समस्या सोडवणारे संशोधन करावे, असे आवाहन विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री हर्षवर्धन यांनी तिसऱ्या भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी येथे केले. अण्णा विद्यापीठात हा कार्यक्रम झाला. त्या वेळी ते बोलत होते. विविध संस्थांचे प्रतिनिधी व वैज्ञानिक या वेळी उपस्थित होते.

हा महोत्सव यंदा प्रथमच दिल्लीबाहेर आयोजित करण्यात आला होता. या वेळी पृथ्वी विज्ञान खात्याचे सचिव राजीवन नायर, तामीळनाडूचे उच्च शिक्षणमंत्री अन्बलगन, बांगलादेशचे विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री उस्मान, अफगाणिस्तानचे विज्ञान तंत्रज्ञानमंत्री अब्दुल रोशन, विज्ञान भारतीचे प्रमुख विजय भटकर, विज्ञान-तंत्रज्ञान  सचिव आशुतोष शर्मा, विज्ञान-तंत्रज्ञान राज्यमंत्री वाय. एस. चौधरी उपस्थित होते. विज्ञान तंत्रज्ञानमंत्री हर्षवर्धन म्हणाले, की मी परदेशात अनेक वैज्ञानिक कार्यक्रमांना उपस्थित राहिलो आहे. त्यावरून तरी आपले विज्ञान जगाच्या तुलनेत कमी दर्जाचे आहे असे मला वाटत नाही. पंतप्रधान मोदी यांनी विज्ञान खात्याची तरतूद मोठय़ा प्रमाणात वाढवली आहे. वैज्ञानिकांनी समाजाशी संपर्क ठेवून लोकांच्या दैनंदिन समस्यांवर तांत्रिक उत्तरे शोधली पाहिजेत. प्रयोगशाळेतील संशोधन समाजापर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे. जागतिक पातळीवर संशोधनाच्या क्षेत्रात ज्या बाराशे संस्था काम करीत आहेत, त्यात भारताचा सातवा क्रमांक आहे. विज्ञान महोत्सव साजरे करण्यातही आपल्या देशाचा नववा क्रमांक आहे. खासगी निधीपुरवठा असलेल्या जगातील ज्या बावनशे संस्था आहेत, त्यात भारताचा ७५ वा क्रमांक आहे. अवकाश संशोधन क्षेत्रात भारताने मोठी प्रगती केली असून दक्षिणआशियाई उपग्रह सोडला आहे. अनेक प्रगत देशांचे उपग्रह भारताने सोडले आहेत. पंतप्रधान मोदी यांचे नवभारताचे स्वप्न साकार करण्यासाठी तरुण सशोधकांनी पुढे येण्याची गरज त्यांनी प्रतिपादन केली. सीएसआयआरने गरिबांना वापरता येणारे २५० प्रकारचे तंत्रज्ञान तयार केले असून आपल्या देशातील विज्ञान त्यातून लोककेंद्री होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.