Toilet Breaks in Office Chats Viral : कार्यालयीन वेळेत तुम्ही कितीवेळ ब्रेक घेता याकडे तुमच्या मॅनेजरचं अत्यंत व्यवस्थित लक्ष असतं. नाश्त्यासाठी ब्रेक, जेवणासाठी ब्रेक आणि शौचास जाण्यासाठी घेतलेल्या ब्रेकचं नियोजनही करायला सांगितलं जातं. अनेक कंपन्यांमध्ये दिवसभरातील संपूर्ण ब्रेकसाठी एक ठराविक कालावधी दिला जातो. ठरवून दिलेल्या तासाव्यतिरिक्त ब्रेक घेतल्यास संबंधित कर्मचाऱ्याला फैलावर घेतलं जातं. अगदी तुम्ही शौचास जाण्यासाठी अतिरिक्त ब्रेक घेतला तरीही तुम्हाला ओरडा मिळू शकतो. हे तुम्हाला अतिशयोक्ती वाटत असेल तर एका नेटकऱ्याने रेडिटवर एक स्क्रिनशॉट शेअर केलाय. तो स्क्रिन शॉट पाहून तुम्हाला याची कल्पना येईल.
एका कर्मचाऱ्याने रेडिटवर ऑफिस ग्रुपचे चॅट शेअर केले आहेत. या चॅटनुसार प्रत्येक कर्मचाऱ्याला दिवसभरातील ब्रेकसाठी ६० मिनिटांचा वेळ देण्यात आलेला आहे. त्यामुळे तुम्ही कितीही वेळा ब्रेक घेतलात तरी तो ६० मिनिटांच्या वर जाणार नाही, अशी तंबीच दिलेली आहे. तसंच, प्रत्येकवेळी ब्रेकला जाण्याआधी मॅनेजरची परवानगी घेण्याचाही नियम बनवण्यात आला आहे. त्यानुसार ग्रुपमध्ये ब्रेक घेताना ब्रेकची माहिती द्यावी लागते.
चॅट स्क्रिनशॉटमध्ये काय दिसतंय?
“जेव्हा तुम्ही १०-१५ मिनिटांचा ब्रेक घेता तेव्हा तुम्ही तुमचा पुढचा ब्रेक ६० मिनिटांतून वजा करूनच घ्यायचा आहे. एका दिवसातील एकूण ब्रेक ६० मिनिटांच्या मर्यादेपेक्षा जास्त नसावा”, असं मॅनेजर त्यांच्या कर्मचाऱ्यांना सांगत असल्याचं चॅटमधून स्पष्ट होतंय. एका कर्मचाऱ्याने त्याच्या ब्रेकची वेळ २७ मिनिटानी वाढवल्याने मॅनेजरने त्याला चांगलंच झापलं. त्यामुळे त्याने टॉयलेट ब्रेक घेतल्याचं मॅनेजरला सांगितलं. त्यावर मॅनेजरने टॉयलेट ब्रेकही ६० मिनिटांच्या मर्यादेतच घ्यायचा, अशी तंबी दिली.
तर एका कर्मचाऱ्याने ६० मिनिटांच्या ब्रेकमध्ये टॉयलेट ब्रेकसाठ १० मिनिटांचा अतिरिक्त ब्रेक मागितला. मात्र, हा अतिरिक्त ब्रेक देण्यास मॅनेजरने सरळ नकार दिला. तसंच, या विषयी अधिक चर्चा नको असं सांगत संवादही थांबवला. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना मॅनेजरचं ऐकण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.
हा चॅट रेडिटवर अपलोड होताच अनेक नेटकऱ्यांनी यावर संताप व्यक्त केला आहे. हे ऑफिस आहे की शाळा अशीही विचारणा अनेकांनी केली. अशा पद्धतीने धाक दाखवून कंपनीला काय साध्य करायचं आहे? असाही प्रश्न नेटकरी विचारत आहेत.