इंग्लंड, उत्तर आर्यलड, वेल्स आणि स्कॉटलंड यांना आजवर एकत्रितपणे ‘युनायटेड किंगडम’ म्हणून ओळखले जात होते. मात्र, स्कॉटलंडने यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. २०१४ मध्ये याच दृष्टीने सार्वमत घेण्यात येणार असून, या देशाची जनता ब्रिटिश साम्राज्याचा घटक राहील, पौंड हेच या देशाचे वित्तीय चलन असेल, मात्र स्कॉटलंडला स्वतंत्र संरक्षण दल असेल असे एका वरिष्ठ मंत्र्यांनी स्पष्ट केले. तसा बृहद् आराखडाही तयार करण्यात आला आहे.
ग्लासगो येथे स्कॉटलंडचे पहिले मंत्री आणि स्कॉटिश नॅशनल पक्षाचे अध्यक्ष अॅलेक्स सालमंड यांनी ६७० पानी ‘श्वेतपत्रिका’ प्रसिद्ध केली. ‘या स्वातंत्र्यामुळे स्कॉटलंडचे रहिवासीच आता या देशाचे भविष्य आपल्या हातांनी रेखाटतील, असे भावपूर्ण उद्गार अॅलेक्स यांनी या वेळी बोलताना काढले. ‘इतिहासात आजवर अनेक देशांनी स्वातंत्र्य मिळवले आहे. प्रत्येक देश स्वतंत्र होताना एक पाश्र्वभूमी असते.
आजवरच्या इतिहासाचा विचार करता, स्कॉटलंडला स्वतंत्र होताना अतिशय आश्वासक पाश्र्वभूमी लाभली असल्याचे, सालमंड यांनी नमूद केले.
काही व्यवस्था जुन्याच
स्कॉटलंड देश म्हणून स्वतंत्र होत असला तरीही आम्ही ब्रिटनच्या राणीचे एकनिष्ठ प्रजाजन राहू, असे सांगत सालमंड यांनी राष्ट्रप्रमुख म्हणून ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीयच असेल असे स्पष्ट संकेत दिले. तसेच नव्या राष्ट्रासाठी वापरण्यात येणारे चलनही ब्रिटिश पौंड असेल असे ते म्हणाले. युरोपीय महासंघाचे घटक राष्ट्र म्हणून राहण्याची त्यांची तयारी असल्याचेही त्यांनी या वेळी नमूद केले.
नव्या राष्ट्राच्या नव्या रचना
स्कॉटलंड सरकारची बहुप्रतीक्षित श्वेतपत्रिका मंगळवारी जाहीर करण्यात आली. स्कॉटलंडलाही आता स्वत:ची संरक्षण व्यवस्था असेल तसेच यापुढे करपद्धती, कररचना आणि करवसुलीची यंत्रणा या तीनही बाबी आमच्या आम्ही स्वतंत्रपणे करू, असे सालमंड म्हणाले. ३०६ वर्षांच्या ‘युनायटेड किंगडम’मधील सहभागास या श्वेतपत्रिकेद्वारे पूर्णविराम मिळाला.
सार्वमत लवकरच
२०१४ मधील १८ सप्टेंबर रोजी स्कॉटलंडमध्ये सार्वमत घेतले जाणार आहे. ‘स्कॉटलंड हे पूर्णपणे स्वतंत्र राष्ट्र म्हणून जाहीर व्हावं असं तुम्हाला वाटतं का,’ असा सवाल या सार्वमतात त्यांना विचारण्यात येईल. त्याच दृष्टीने कार्यक्रम जाहीर करणाऱ्या श्वेतपत्रिकेत, चलनद्धती, करपद्धती, बालसंगोपन, कुटुंबकल्याण आदी मुद्दय़ांचा सहभाग आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा