मलेशियाच्या गेल्या आठ मार्चला बेपत्ता झालेल्या विमानाचे अवशेष असलेल्या दोन वस्तू ऑस्ट्रेलियाच्या पी ३ ओरायन विमानांना दिसल्या असून ते पर्थपासून २५०० कि.मी अंतरावर सागरात आहेत, तो बहुदा विमानाचा ढिगारा असल्याचा संशय आहे. दरम्यान, या विमानातील सर्व २३९ व्यक्तींचा मृत्यू झाल्याची घोषणा मलेशियाचे पंतप्रधान नजीब रझाक यांनी सोमवारी रात्री उशिरा केली. मृत व्यक्तींमध्ये २२७ प्रवासी व १२ कर्मचारी असून प्रवाशांमध्ये पाच भारतीयांचा समावेश आहे. या पाचजणांमध्ये मुंबईच्या एकाच कुटुंबातील चेतन कोळेकर (५५), स्वानंद कोळेकर (२३), विनोद कोळेकर (५९) यांच्याखेरीज चंद्रिका शर्मा (५१) आणि क्रांती शिरसाट (४४) हे मृत्यूमुखी पडले आहेत.
ढिगाऱ्याचे अवशेष चीनच्या विमानालाही दिसले आहेत. आधी उपग्रहाच्या छायाचित्रातून हा एमएच ३७० विमानाचा हा ढिगारा कोठे आहे ते स्पष्ट झाले होते. चीनच्या प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे, की आम्हाला त्या विमानाचा ढिगारा किंवा अवशेष दिसले आहेत. दरम्यान, अमेरिकेने असे म्हटले आहे, की विमानाचा ब्लॅक बॉक्स शोधण्यासाठी या भागात खास यंत्र पाठवण्याची सोय आम्ही करू शकतो. आयएल-७६ विमानाच्या कर्मचाऱ्यांना दक्षिण हिंदी महासागरात हा ढिगारा दिसला असून आता ऑस्ट्रेलियाच्या नियंत्रण कक्षाशी या माहितीच्या आधारे संपर्क साधण्यात आला आहे. याबाबत सविस्तर तपशील उपलब्ध झालेला नसून, ऑस्ट्रेलिया व चीन या देशांनी टिपलेल्या छायाचित्रांत संभाव्य ढिगारा दिसला आहे. मलेशिया एअरलाइन्सचे एमएच ३७० विमान ८ मार्चला बेपत्ता झाले असून त्यात २३९ प्रवासी होते. त्यात पाच भारतीय प्रवाशांचा समावेश होता. अमेरिकेच्या पॅसिफिक कमांडने असे म्हटले आहे, की आम्ही ब्लॅक बॉक्सचा शोध घेण्यासाठी ब्लॅक बॉक्स लोकेटर हे यंत्र पाठवण्यात येईल, पण ते ढिगारा सापडत नाही तोपर्यंत ब्लॅक बॉक्स लोकेटर पाठवला जाणार नाही. एकदा ढिगारा सापडला की आम्ही लगेच ते यंत्र पाठवून विमान शोधून काढू, असे अमेरिकेच्या सातव्या आरमाराचे अधिकारी कमोडोर ख्रिस ब्युड यांनी सांगितले.
चीनची इल्युशिन प्रकारची दोन विमाने ऑस्ट्रेलियात शोध घेत आहेत, त्यामुळे तेथे शोध घेणाऱ्या विमानांची एकूण संख्या ८ झाली आहे. दक्षिण िहदी महासागरात पर्थच्या नर्ऋत्येला २५०० किलोमीटर अंतरावर हा ढिगारा असल्याचा अंदाज असला तरी आता त्या भागात पावसाने शोधकार्यात अडथळे येण्याची शक्यता आहे असे ऑस्ट्रेलियाच्या सागरी सुरक्षा प्राधिकरणाने म्हटले आहे. ऑस्ट्रेलियाचे वाहतूकमंत्री वॉरेन ट्रस यांनी सांगितले, की सोमवारचा दिवस वाया गेला असून त्यात काहीही नवे हाती लागले नाही. पॅरिस येथे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रोमेन नदाल यांनी सांगितले, की उपग्रह रडारला काही प्रतिध्वनी मिळाले असून ते मलेशियन विमानाच्या ढिगाऱ्याचे असावेत असा एक अंदाज आहे. ती छायाचित्रे नाहीत, पण त्यांच्या मदतीने संबंधित ढिगारा शोधून काढता येऊ शकेल. चीन व ऑस्ट्रेलियाच्या विमानांना ढिगारा जिथे दिसला आहे, तेथून तो उत्तरेला ९३० कि.मी. अंतरावर आहे असे फ्रान्सच्या माहितीवरून सूचित होते. दरम्यान, चीन व ऑस्ट्रेलिया यांना दिसलेला भाग २२ बाय १३ मीटरचा असून तो कार्गोचा लाकडी भाग आहे.ढिगारा शोधण्यात तज्ज्ञ असलेले डेव्हिड मीयाम्स यांनी सांगितले, की फ्रान्सच्या उपग्रहांनी उपयुक्त माहिती दिली आहे.
द पिंगर लोकेटर
विमान समुद्रात तळाशी बुडालेले असते तेव्हा जहाजांच्या पाठीमागे हे यंत्र लावले जाते व जहाज हळूहळू संबंधित भागातून मार्गक्रमण करते. या यंत्राला ‘द टोड पिंगर लोकेटर’ असे म्हणतात. ढिगारा ज्या भागात आहे तेथून जाताना विमानाचे अस्पष्ट संदेश म्हणजे पिंग्ज हे यंत्र टिपते. आताच्या परिस्थितीत ब्लॅक बॉक्स एवढय़ा अथांग महासागरात शोधण्यासठी पिंगर लोकेटर यंत्र हाच एक उपाय आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा