पीटीआय, नवी दिल्ली
अदानी-हिंडनबर्ग वाद प्रकरणात, अदानी समूहाने आपल्या समभागांची किंमत फुगवून दाखवल्याच्या आरोपांची चौकशी पूर्ण करण्यासाठी अधिक वेळ द्यावा, अशी मागणी सेबीने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात केली. या प्रकरणात चौकशी पूर्ण करण्यासाठी आणखी १५ दिवसांची मुदत द्यावी, अशी मागणी सेबीने नव्याने केलेल्या अर्जात केली आहे. या तपासासाठी सर्वोच्च न्यायालयाने सेबीला दिलेली मुदत १४ ऑगस्टला संपत आहे.
आतापर्यंत आपण २४ प्रकरणांचा तपास आणि चौकशी केली आहे, असे सेबीने आपल्या अर्जात नमूद केले आहे. त्यापैकी १७ चौकशी पूर्ण आणि अंतिम असून त्यांना सक्षम अधिकाऱ्यांची मंजुरी मिळाली आहे. एका प्रकरणात आतापर्यंत संकलित करण्यात आलेल्या सामग्रीच्या आधारे चौकशी पूर्ण करण्यात आली असून अंतरिम अहवाल तयार करण्यात आला आहे. सेबीच्या सध्याच्या प्रक्रिया आणि रिवाजानुसार सक्षम अधिकाऱ्यांकडून त्याला मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती सेबीकडून देण्यात आली.
सेबीने न्यायालयाला सांगितल्यानुसार, उरलेल्या सहा प्रकरणांपैकी चार तपासांचे निष्कर्ष काढण्यात आले आहे आणि त्याचे अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणाच्या पुढील सुनावणीपूर्वी म्हणजे २९ ऑगस्टपूर्वी हे अहवाल पूर्ण होतील. उरलेल्या दोन प्रकरणांपैकी एका प्रकरणाचा तपास प्रगत टप्प्यावर आहे आणि एका प्रकरणात आतापर्यंत मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याचा अंतरिम अहवाल तयार करण्यात आला आहे.
या कामासाठी सेबीने परदेशी न्यायालयांच्या कार्यक्षेत्रातील व्यक्ती, संस्था आणि नियामकांकडून माहिती मागवली आहे. अशी माहिती मिळाल्यानंतर हे अंतरिम अहवाल अद्ययावत केले जातील. आतापर्यंतची प्रगती पाहता तपास पूर्ण होण्यासाठी अधिक वेळ मिळणे न्याय्य आहे, असे सेबीने आपल्या अर्जात नमूद केले आहे.