Indian Immigrants Deported from US Update: भारतातून अवैधपणे अमेरिकेत गेलेल्या स्थलांतरीतांना पुन्हा मायदेशी पाठविणारे दुसरे विमान शनिवारी (१५ फेब्रुवारी) अमृतसर विमानतळावर उतरणार आहे. या विमानात ११९ भारतीय नागरिक असल्याचे सांगितले जाते. यापैकी ६७ प्रवाशी एकट्या पंजाबमधील आहेत. तर तिसरे विमान १६ फेब्रुवारी रोजी येणार आहे. मात्र शनिवारी भारतीय नागरिकांना आणणारे विमान अमेरिकन लष्कराचे असणार आहे की, भारत सरकार विमानाचा बंदोबस्त करणार आहेत? याबद्दल अद्याप साशंकता आहे. ५ फेब्रुवारी रोजी अमेरिकन लष्कराचे सी-१७ हे विमान १०४ भारतीयांना घेऊन अमृतसर विमानतळावर आले होते. ज्यामध्ये हरियाणा, गुजरात आणि पंजाबच्या नागरिकांचा अधिक भरणा होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच दोन दिवसीय अमेरिका दौरा केला. यावेळी त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी अवैद स्थलांतराच्या मुद्द्यावर चर्चा केली. तसेच दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर झालेल्या संयुक्त परिषदेत पंतप्रधान मोदी यांनी या मुद्द्यावर आपली सविस्तर भूमिका मांडली.

द इंडियन एक्सप्रेसने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या विमानाप्रमाणे या विमानात भारतीय नागरिकांना बेड्या, साखळ्या घातल्या जाणार नाहीत. पहिल्या विमानातील नागरिकांच्या हातात बेड्या घातल्यामुळे भारत सरकारवर जोरदार टीका करण्यात आली होती. भारतीयांना गुन्हेगारांप्रमाणे वागणूक दिल्याचा आरोप विरोधकांनी सरकारवर केला होता. लोकसभेत या विषयावरून गदारोळ उडाल्यानंतर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी निवेदन दिले होते. भारतीयांना अमानवीय वागणूक दिल्याचा मुद्दा अमेरिकेसमोर मांडला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले होते.

स्थलांतरितांना घेऊन येणारे दुसरे विमान शनिवारी रात्री १० ते ११ वाजण्याच्या सुमारास अमृतसर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचण्याची अपेक्षा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या विमानात पंजाबचे ६७, हरियाणाचे ३३, गुजरातचे ८, उत्तर प्रदेशचे ३, महाराष्ट्र आणि राजस्थानचे प्रत्येकी २ आणि गोवा, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरचा प्रत्येकी एक प्रवासी आहे.

पहिल्या विमानातून आलेल्या स्थलांतरितांनी अमेरिकेत प्रवेश करण्यासाठी अवैध अशा डंकी मार्गाचा अवलंब केला होता. अनेकांनी एजंटला कोट्यवधी रुपये देऊन अनेक देशांमधून खडतर प्रवास केला होता. त्यांच्या प्रवासाबद्दलच्या अनेक कहाण्या हळू हळू समोर येत आहेत. पहिले विमान आल्यानंतर पंजाब आणि हरियाणा सरकारने अवैध एजंटना अटक केली होती.