तस्कर आणि सीमाशुक्ल अधिकारी यांच्या सुरस कथा अधूनमधून वृत्तपत्रांतून वाचायला मिळत असतात. सिनेमात आणि प्रत्यक्षातही प्राचीन तसेच सोन्याच्या मूर्तीची तस्करी करणारी टोळी अधूनमधून पकडली जाते. तस्करी करून आणताना जप्त करण्यात आलेल्या अशा अनेक वस्तूंचे अनोखे संग्रहालय लवकरच पूर्ण होणार आहे. या संग्रहालयाच्या दुसऱ्या व अंतिम टप्प्यातील काम लवकरच पूर्ण होणार असून जानेवारीमध्ये हे अनोखे संग्रहालय खुले केले जाणार आहे.
भारतीय सीमाशुक्ल व केंद्रीय उत्पादन शुल्क संग्रहालय असे या संग्रहालयाचे नाव आहे, अशी माहिती गोव्याचे सीमाशुल्क व उत्पादनशुल्क विभागाचे आयुक्त व्ही. पी. सी. राव यांनी दिली. २००९ साली या संग्रहालयाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन राष्ट्रपती व तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते करण्यात आले होते. २०० वर्षांपूर्वीच्या पोर्तुगीजांनी बांधलेल्या ‘ब्ल्यू बिल्डिंग’ या हेरिटेज वास्तूमध्ये हे संग्रहालय स्थापन करण्यात आले आहे.
सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांपासून आपल्या मौल्यवान चीजवस्तू दडवून आणण्यासाठी तस्करांनी अनेक अभिनव पद्धतींचा वापर वेळोवेळी केला आहे असे सांगून व्ही. पी. सी. राव म्हणाले की, या संग्रहालयात तस्कर व करचुकवे आणि सीमाशुल्क, उत्पादनशुल्क विभागाचे अधिकारी यांच्यातील न संपणाऱ्या लढाईचे अनेक नमुने पाहायला मिळतील. गोरखपूर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी पकडलेली जंब्बाला ही सोन्याची प्राचीन मूर्ती या संग्रहालयात आहे. नेपाळहून तस्करी करून ही मूर्ती आणताना पकडण्यात आली होती. अबुल फझलच्या हस्ताक्षरातील ‘ऐन-ए-अकबरी’ हा ग्रंथही पाटणा सीमाशुल्क विभागाने जप्त केला होता तोही या संग्रहालयात ठेवण्यात येणार आहे. परकीय चलनी नोटा, सोने आणि अनेक प्रतिबंध घालण्यात आलेल्या चीजा तस्करी करून देशात आणताना पकडण्यात आल्या असून त्याही या संग्रहालयात असतील. बूटांचे सोल, सायकल टायर, मोटारीचे इंजिन तसेच शरीराच्या अवयवांमध्ये खुबीने दडवून ठेवलेले सोने अथवा मौल्यवान माल तस्करांनी देशात आणताना पकडला गेला. चालण्यासाठी वृद्ध माणसे काठी वापरतात त्या काठीमध्ये मौल्यवान धातू, हिरे तस्करी करून आणताना पकडण्यात आले. अशा सगळ्या वस्तूही संग्रहालयात असतील, अशी माहिती व्ही. पी. सी. राव यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा