आपला पूर्वी झालेला विवाह लपवून दुसऱ्या महिलेशी विवाह करणे हिंदू विवाह कायद्यान्वये बेकायदेशीर आहे हे सत्यच. मात्र या कारणास्तव दुसऱ्या पत्नीस असलेला पोटगी मिळवण्याचा हक्कहिरावून घेता येणार नाही. पोटगीच्या दृष्टीने तिला ‘कायदेशीररीत्या विवाह झालेल्या पत्नी’चा दर्जा असेल, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला.
न्या. रंजना प्रकाश देसाई आणि न्या. ए. के. सिक्री यांच्या खंडपीठाने हा ऐतिहासिक निर्णय दिला. हिंदू विवाह कायद्यानुसार दुसऱ्या लग्नास परवानगी नसल्याने अशा पद्धतीने विवाह झालेल्या पत्नीस पोटगी देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानेच यापूर्वी दिला होता. मात्र खंडपीठाने हा निर्णय योग्य नसल्याचे मत नोंदवले.
..तर पूर्वीचाच निर्णय ग्राह्य़
जर एखाद्या स्त्रीला पुरुषाचा पहिला विवाह झाला आहे, हे माहिती असूनही तिने त्याच्याशी विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतला असेल तर मात्र अशी महिला पोटगीस पात्र ठरणार नाही. याबाबतीत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय कायम राहील, असेही खंडपीठाने स्पष्ट केले.
पहिल्या विवाहाबद्दल अंधारात
ठेवून दुसरा विवाह करण्यात आला असल्यास यात त्या महिलेचा काय दोष? त्यामुळेच अशी महिला पोटगीस अपात्र ठरल्यास फसवणुकीचे प्रमाण वाढण्याची भीती आहे. त्यामुळेच केवळ पोटगीच्या प्रश्नाचा विचार करता अशा महिलेस विवाहित पत्नीचाच दर्जा दिला जावा आणि तिला पोटगी मिळावी.’
न्या. रंजना देसाई व न्या. सिक्री