जगभरातून लादले जाणारे आत्यंतिक कठोर र्निबध धुडकावून लावत रशियाने क्रायमियाच्या स्वातंत्र्यावर शिक्कामोर्तब केले. मात्र अध्यक्ष पुतिन यांच्या या पावलामुळे, युरोपात दुसऱ्या महायुद्धानंतरचा सर्वात कठीण पेचप्रसंग उद्भवला आहे. तर, सीरियाप्रश्नी चर्चेचा आणि शस्त्रास्त्र निरीक्षणाचा पर्याय ठेवत अमेरिकेला नमते घेण्यास भाग पाडणाऱ्या रशियाच्या या भूमिकेने वॉशिंग्टनला जणू आव्हानच दिले आहे. त्यामुळे युक्रेन आणि क्रायमिया या मुद्दय़ांवरून दुसऱ्या शीतयुद्धाची नांदीच होत असल्याचे दिसत आहे.
रशियासमोर आव्हान निलंबनाचे
क्रायमियाच्या स्वातंत्र्याला रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मान्यता दिल्यामुळे रशियावर शीतयुद्ध काळापेक्षा अधिक कडक र्निबध लादण्यात आले आहेत. क्रायमियन पेचप्रसंगात सामील असलेल्या रशियाच्या अधिकाऱ्यांची मालमत्ता युरोपीय समुदायाने गोठवली असून आर्थिक र्निबधही जारी केले आहेत. रशियाने युक्रेनमधील हस्तक्षेप थांबवला नाही तर आणखी र्निबध लादण्यात येतील असा इशारा अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांनी दिला आहे. तर, जपानने रशियावर कठोर र्निबध लादण्याचा इशारा दिला आहे. व्हिसा व इतर प्रश्नांवर रशियाशी वाटाघाटी थांबवण्यात येत असल्याचे जपानतर्फे सांगण्यात आले. रशियाने क्रायमियाच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली हे निषेधार्ह आहे, असेही जपानी परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. जी-८ राष्ट्रांच्या समूहातून रशियाला निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे फ्रान्सच्या परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वीच रशियाच्या समावेशामुळे, जी-७ राष्ट्रसमूहाचे जी-८ मध्ये रूपांतर झाले होते, मात्र आता रशियातील सोची येथे होणाऱ्या जी-८ परिषदेत रशियालाच हजर राहू दिले जाणार नसल्याचे उर्वरित सातही राष्ट्रांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान अमेरिकेचे उपाध्यक्ष जो बिदेन यांनी युरोपचा दौरा सुरू केला असून ते पोलंडला आले आहेत. त्यांनी पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क व अध्यक्ष ब्रोनीस्लॉ कोमोरोवस्की यांच्याशी चर्चा करण्याचे प्रस्तावित केले आहे. लिथुआनियाचे अध्यक्ष दालिया ग्रायबॉसकाइट व लॅटव्हियाचे अध्यक्ष आंद्रिस बेरझिन्स यांच्याशीही ते चर्चा करणार आहेत. दरम्यान क्रायमिया हा अजूनही युक्रेनचा भाग आहे, असे ब्रसेल्स येथील बैठकीनंतर ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री विल्यम हेग यांनी सांगितले. लष्करी बळावर क्रायमियाचे स्वातंत्र्य घोषित केले असून ते बेकायदेशीर आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
क्रायमिया आमचेच होते -पुतिन
क्रायमिया हा रशियाचा अविभाज्य भाग होता आणि सदैव राहील, असे प्रतिपादन रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी केले. क्रायमियाने रशियामध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर, त्या दृष्टीने उभयपक्षीय नेत्यांच्या करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. त्या वेळी पुतिन यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. सर्बियातून कोसोव्हो हे राष्ट्र १७ मार्च, २००७ रोजी स्वतंत्र झाले, त्या वेळी पाश्चिमात्य राष्ट्रांनी विशेषत: अमेरिकेने आणि संयुक्त राष्ट्रांनी त्यास तातडीने मान्यता दिली होती. मग ही राष्ट्रे आताच का विरोधी सूर लावत आहेत, असा सवाल त्यांनी केला.
युरोपचा नकाशाच बदलणार
क्रायमिया हा युक्रेनमधून फुटून बाहेर पडल्यानंतर आता युरोपमध्ये आतापर्यंतचा सर्वात भीषण पेचप्रसंग निर्माण झाला आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपच्या सीमा बदलणार आहेत. क्रायमिया हा १८व्या शतकात रशियाचा भाग होता व सोविएत नेते निकिता क्रुश्चेव्ह यांनी तो १९५४ मध्ये युक्रेनला दिला होता. या निर्णयानंतर आता क्रायमिया रशियात सामील झाला आहे. या निर्णयाचे पडसाद तेलबाजारावरही उमटले. आशिया बाजारपेठेत तेलाच्या किमतींचे दर संमिश्र राहिले. दरम्यान अमेरिकेचे उपाध्यक्ष जो बिदेन यांनी युरोपचा दौरा सुरू केला असून ते पोलंडला आले आहेत. त्यानंतर ते लिथुआनिया आणि लॅटव्हिया या देशांच्या पंतप्रधानांशीही संवाद साधणार आहेत.