दिल्ली विधानसभेसाठी प्रमुख पक्षांच्या प्रचाराने रंगत आणली असून, मतदानापूर्वीच्या शेवटच्या रविवारी भाजप, आम आदमी पक्ष व काँग्रेसने जाहीर सभांचा धडाका लावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी प्रचारसभा घेतल्या; तर सत्ता सोडल्याबद्दल आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा क्षमायाचना केली आहे. येथे ७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे.
‘प्रचारक’ नरेंद्र मोदी व ‘धरणेबाज’ अरविंद केजरीवाल या खोटी आश्वासने देणाऱ्यांपासून दिल्लीकरांनी सावध राहावे. प्रचारकी थाटात मोदी केवळ प्रचारच करतात, तर केजरीवाल हे धरण्यांमध्येच व्यग्र असतात. दिल्लीकरांना निव्वळ आश्वासने नको, तर सुशासन हवे आहे. यूपीएच्या काळातील योजना सध्याचे सरकार रद्द करण्याच्या प्रयत्नात आहे. अन्नसुरक्षा, भूसंपादन तसेच भ्रष्टाचार रोखण्यात सरकारने काहीही पावले उचलली नाहीत.
– सोनिया गांधी, कॉंग्रेस अध्यक्ष
मला नशिबाने साथ दिल्यानेच जीवनावश्यक वस्तूंचे भाव खाली आले, असे विरोधक म्हणतात. मात्र यामुळे जर तुमचे पैसे वाचत असतील तर मग माझ्यासारख्या ‘नशीबवान’ व्यक्तीला साथ देऊन भाजपला मतदान करा. केंद्र सरकारच्या आठ महिन्यांच्या कालावधीत इंधनाचे भाव कमी झाले. त्यावर सरकारच्या कामगिरीपेक्षा मोदी नशीबवान असल्याचे म्हणतात, पण हा जनतेचा आशीर्वाद आहे. विकासासाठी भाजपला पाठिंबा द्या.
– नरेंद्र मोदी, पंतप्रधान
मुख्यमंत्री म्हणून ४९ दिवसांच्या कारकिर्दीत केलेल्या कृतींबद्दल जनतेची माफी मागतो. पुन्हा सत्ता सोडणार नाही. आमच्या कृतीमुळे दिल्लीतील लोकांना विश्वासघात झाल्यासारखे वाटते. आम्ही त्यांची निराशा केल्याबद्दल दिलगीर आहोत. पण आम्ही खोटे बोललो नाही किंवा चोरीही केली नाही; तथापि आमच्या कृतींमुळे लोक दुखावले गेले, हे मी मान्य करतो.
– अरविंद केजरीवाल, आपचे नेते