युक्रेनवरील रशियन हल्ल्याविरोधात तटस्थ राहिल्यामुळे इम्रान खान यांना पंतप्रधान पदावरून हटवण्याकरता अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने पाकिस्तान सरकारला प्रोत्साहित केल्याचा मोठा दावा दि इंटरसेप्ट या वृत्तसंकेतस्थळाने केला आहे. लीक झालेल्या कागदपत्रांच्या हवाल्याने हा दावा करण्यात आला आहे.
७ मार्च २०२२ रोजी अमेरिकेतील पाकिस्तानचे राजदूत आणि परराष्ट्र विभागाच्या दोन अधिकाऱ्यांमध्ये ही बैठक झाली होती. त्यानंतर ८ मार्च २०२२ रोजी इम्रान खान यांच्याविरोधात विधानसभेत अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. १० एप्रिल २०२२ रोजी इम्रान खान यांची पंतप्रधान पदावरून हकालपट्टी करण्यात आली.
लीक झालेल्या कागदपत्रात काय आहे?
युक्रेनवरील रशियन आक्रमणावर तटस्थ भूमिका घेतल्याने अमेरिकेने इम्रान खान यांना काढून टाकण्यासाठी पाकिस्तानवर दबाव आणला होता.
“आम्ही तुमचे गुलाम आहोत का? तुम्हाला आमच्याबद्दल काय वाटतं? की आम्ही तुमचे गुलाम आहोत आणि तुम्ही आमच्याकडे जे काही मागाल ते आम्ही करू? आम्ही रशियाचे मित्र आहोत आणि अमेरिकेचेही मित्र आहोत. आम्ही चीन आणि युरोपचेही मित्र आहोत. आम्ही कोणत्याही युतीचा भाग नाही”, असं इम्रान खान एका रॅलीत म्हणाले होते. इम्रान खान यांच्या या भूमिकेमुळे अमेरिकेने नाराजी दर्शवली होती.
हेही वाचा >> पाकिस्तानमध्ये मध्यरात्री राजकीय घडामोडी; संसद बरखास्त, देश काळजीवाहू सरकारच्या हाती!
वॉशिंग्टनने युक्रेनबाबत पाकिस्तानच्या या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. पाकिस्तान अशी तटस्थ भूमिका घेत असेल तर अमेरिका आणि युरोपमधील लोक चिंतेत आहेत, असं दक्षिण आणि मध्य आशियाई व्यवहार ब्युरोचे सहय्यक परराष्ट्र सचिव डोनाल्ड लू यांनी या लीक झालेल्या कागदपत्रांत म्हटलं आहे.
तसंच, खान यांच्या या भूमिकेवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतही चर्चा झाली. त्यानंतर, लू यांनी पाकिस्तानी संसदेत अविश्वास ठरावाचा मुद्दा उपस्थित केला. जर, खान यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर झाला तर वॉशिंग्टन सर्वांना माफ करेल, असंही या दस्तावेजात नमूद आहे.
अमेरिकेने पाकिस्तानला एकटे पाडण्याची धमकी दिली आहे. युरोपही अशाचप्रकारची भूमिका घेऊ शकतं, असं स्टेट डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याने या दस्तावेजात नोंदवलं आहे. इम्रान खान पंतप्रधान म्हणून कायम राहिल्यास अमेरिका आणि युरोप पाकिस्तानवर बहिष्कार घालतील असंही यात म्हटलं आहे.
दरम्यान, इम्रान खान यांची हकालपट्टी करण्यात अमेरिका महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचा अफवाही पसरल्या होत्या. परंतु, याबाबत अधिकृत पुरावा सापडला नव्हता. २७ मार्च २०२२ रोजी इम्रान खान यांनी सांगितलं होतं की वॉशिंग्टनसारख्या परकीय शक्ती त्यांना पदावरून हटवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे, आता हे कागदपत्र लीक झाल्याने इम्रान खान यांच्या गच्छंतीमागे अमेरिकेचाच हात असल्याचे स्पष्ट झाले आहे.