लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी दिल्ली : निवडणुकांतील काँग्रेसच्या पराभवाला पक्षाचे राष्ट्रीय महासचिव आणि राज्यांचे प्रभारी जबाबदार असतील. बुथ स्तरापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत संघटना उभी करण्याची जबाबदारीही त्यांची असेल, असा सज्जड इशारा काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बुधवारी ‘इंदिरा भवन’मध्ये झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला.

हरियाणा, महाराष्ट्र आणि दिल्ली या तीनही राज्यांमध्ये लागोपाठ काँग्रेला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यातून धडा घेऊन काँग्रेसने राज्या-राज्यांमध्ये संघटनात्मक बदल सुरू केले असून महाराष्ट्रामध्ये तळागाळात सक्रिय असलेले हर्षवर्धन सपकाळ यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून सपकाळ यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला. शिवाय, विविध राज्यांचे प्रभारीही बदलण्यात आले असून राजीव शुक्ला यांच्यासारख्या अनुभवी नेत्यांकडून प्रभारीपद काढून घेण्यात आले आहे. ‘गेल्या दोन कार्यकारिणी समितीच्या बैठकांमध्ये मी पक्षामध्ये बदल केले जातील असे सांगितले होते, त्याची सुरुवात झाली असून आणखीही संघटनात्मक बदल केले जातील’, असे खरगेंनी स्पष्ट केले. या बैठकीला लोकसभेतील विरोधीपक्षनेते राहुल गांधींसह सर्व राष्ट्रीय महासचिव व राज्यांचे प्रभारी उपस्थित होते.

महाराष्ट्रासारख्या राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारयाद्यांचा घोळ, केंद्रीय निवडणूक आयुक्त्यांच्या नियुक्तीचा वाद, संविधानाचा मुद्दा आदी मुद्द्यांकडे लोकांचे लक्ष वेधण्याचाही सूचना खरगेंनी खरगेंनी महासचिव व प्रभारींना केली.

पक्ष प्रवेशाबाबत कठोर धोरण

अन्य पक्षांतील नेते-कार्यकर्त्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देताना सावध राहण्याची सूचनाही खरगेंनी केली. ‘संघटना मजबूत करण्याच्या उद्देशाने घाईघाईमध्ये अन्य पक्षांतील नेत्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश दिला गेला. पण, ते काँग्रेसच्या विचारांशी बांधिल नव्हते. अडचणीच्या वेळी ते पक्षाला सोडून पळून गेले’, असे खरगे म्हणाले. वैचारिक बांधिलकी तपासून मगच काँग्रेसमध्ये प्रवेश देण्याचे कठोर धोरण राबवले जाणार असल्याचे खरगेंनी स्पष्ट केले.

पक्षबांधणीत ‘इंटक’ला सहभागी करणार

बुथस्तरावर भाजपच्या तुलनेत काँग्रेसची संघटना कमकुवत असल्याचे निवडणुकीत पक्षाचा पराभव झाल्याचे मानले जाते. त्यामुळे ‘महासचिव, प्रभारी यांनी स्वत: बुथस्तरापर्यंत पोहोचले पाहिजे. बुथस्तरावरील कार्यकर्त्यांना भेटले पाहिजे. काँग्रेसच्या विचारांशी एकनिष्ठ असणाऱ्या नव्या लोकांना पक्षात आणले पाहिजे. कुठल्याही संकटात, कठीण परिस्थितीमध्ये पक्षाबरोबर राहतील असे लोक शोधले पाहिजेत’, अशी सूचना खरगेंनी केली. काँग्रेसच्या इतर संघटनांशी विशेषत: ‘इंटक’ या काँग्रेसच्या कामगार संघटनेला पक्षबांधणीमध्ये सहभागी करून घेण्याचाही सल्ला खरगेंनी दिला.