सुप्रीम कोर्टाने समलैंगिकतेबाबत दिलेल्या ऐतिहासिक निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत असून अखेर आम्हाला न्याय मिळाले. स्वतंत्र भारतात आम्हालाही स्वातंत्र्य मिळाले, अशी भावना हमसफर ट्रस्टचे संस्थापक आणि एलजीबीटी समूहाच्या हक्कांसाठी लढणारे सामाजिक कार्यकर्ते अशोक रावकवी यांनी व्यक्त केली.

सुप्रीम कोर्टाने गुरुवारी भारतीय दंड विधानातील कलम ३७७ च्या वैधतेबाबत निकाल दिला. समलैंगिकांनाही समान अधिकार असून दोन सज्ञान व्यक्तींनी संमतीने ठेवलेले संबंध ही खासगीबाब आहे. त्यामुळे हा गुन्हा ठरत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल सुप्रीम कोर्टाने दिला.  सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर हमसफर ट्रस्टचे संस्थापक अशोक रावकवी यांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली. अशोक रावकवी म्हणाले, अखेर आम्हाला स्वातंत्र्य मिळाले. स्वतंत्र भारतात आम्हालाही स्वातंत्र्य मिळाले.

दरम्यान, श्रीगौरी सावंत यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. सावंत यांनी समलैंगिकांच्या हक्कांचे नेहमीच समर्थन केले आहे. हा अत्यंत महत्वाचा निर्णय असून समाजातील गैरसमज निवळण्यासाठी या निर्णयाचा खूप फायदा होईल. पूर्वी ही ओळख लपवली जात. त्यामुळे एका कुटुंबाचे यात नुकसान होत. या निर्णयामुळे लोक आता खुलेपणाने बोलतील. एकमेकांच्या लैंगिकतेचा आदर करायला हवा, असे त्यांनी सांगितले.