सीरियात आयसिससाठी लढण्याकरिता गेल्याच्या संशयामुळे पकडले गेलेल्या चार भारतीय नागरिकांना मायदेशी आणले जात आहे, असे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितले. या चौघांना सीरियातील सरकारने जानेवारीत अटक केली असून ते आयसिसमध्ये सहभागी होण्यासाठी आले होते. प्रत्यक्षात ते सीरियात आयसिससाठी लढण्याकरिता गेले नव्हते तर नोकरीच्या शोधात वैध कागदपत्रे नसताना लेबनॉनकडे निघाले होते.
अरुणकुमार सैनी, सर्वजित सिंग, कुलदीप सिंग व जोगा सिंग अशी त्यांची नावे असून त्यांचे आपण मायदेशी स्वागत करतो, असे सुषमा स्वराज यांनी ट्विटर संदेशात म्हटले आहे. सीरियाच्या उपपंतप्रधानांशी मी जानेवारीत ते भारतात आले असताना संपर्क साधला व या चार जणांना सोडण्याची विनंती केली होती. सीरियाची मी आभारी आहे, असे त्यांनी संदेशात म्हटले आहे. या चार जणांना सीरियन सरकारने दमास्कस येथे जॉर्डनमधून सीरियात सीमा ओलांडू येताना पकडले होते. त्यांना त्या वेळी लगेच अटक करण्यात आली, ते आयसिसचे सहानुभूतीदार असावेत असा संशय होता. नंतरच्या तपासात असे निष्पन्न झाले होते, की ते आयसिससाठी लढण्यासाठी गेले नव्हते तर बेकायदा स्थलांतरित होते. त्यांच्याकडे कुठलीही कागदपत्रे नव्हती, फेब्रुवारीत परराष्ट्र राज्य मंत्री व्ही.के.सिंह यांनी संसदेत असे सांगितले होते, की अरुणकुमार सैनी, सर्वजीत सिंग, कुलदीप सिंग व जोगा किंवा जग्गा सिंग यांनी जॉर्डनमधून सीरियात प्रवेश केला होता, लेबनॉनकडे जात होते व त्यांच्याकडे वैध व्हिसा नव्हता. ते नोकरीच्या शोधात निघाले होते. सीरियन अधिकाऱ्यांनी त्यांना बेकायदा स्थलांतरित म्हणून पकडले. सीरियाचे वरिष्ठ मंत्री वालिद अल मोलेम हे भारतात आले असताना त्यांनी १३ जानेवारीला जेव्हा सुषमा स्वराज यांच्याशी चर्चा केली, तेव्हा या चार जणांना सोडून देण्याची मागणी स्वराज यांनी केली होती. ते चार जण आयसिससाठी लढण्याकरिता चालले होते, त्यामुळे त्यांना दमास्कस येथे अटक केली होती, असे मोलेम यांनी त्या भेटीत स्वराज यांना सांगितले होते.

Story img Loader