उत्तर प्रदेश पोलिसांना संभाव्य दहशतवादी हल्ल्यांची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रीय राजधानी दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. तेहरिक-ए-तालिबान या दहशतवादी संघटनेचा एक निनावी ईमेल काही जणांना आला होता, ज्याची माहिती उत्तर प्रदेश पोलिसांना देण्यात आली होती. त्यानंतर सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.
उत्तर प्रदेश पोलिसांनी या ई मेल संदर्भात दिल्ली पोलिसांनी तत्काळ माहिती दिली आणि त्यानंतर दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला. विशेष म्हणजे या अगोदर होळीच्या दिवशी देखील दहशतवादी हल्ल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यामुळे अधिक खबरदारी घेतली जात आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही वृत्तवाहिन्यांना धमकीचे मेल आले आहेत. यामध्ये दिल्लीत स्फोट घडवण्याची धमकी देण्यात आलेली आहे. तेव्हापासून सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मेल कोणी पाठवला याचा तपास सुरू आहे. मेल पाठवणाऱ्याने स्वतःची ओळख तेहरीक-ए-तालिबान इंडिया संघटनेशी संबंधित असल्याचे सांगितले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत स्फोटाच्या धमक्या देण्यात आल्या आहेत, मात्र आम्ही दिल्लीला लागून असलेल्या उत्तर प्रदेशच्या भागात देखील सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.