श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यातील ‘झेड मोढ’ बोगद्याभोवतीच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. १३ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले. या उद्घाटन समारंभानंतर मोदींची एक सार्वजनिक सभा आयोजित केली जात आहे. त्यामुळे श्रीनगरसह खोऱ्यातील अनेक भागांत सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
पंतप्रधानांसाठी असलेल्या विशेष सुरक्षा दलाच्या (एसपीजी) कर्मचाऱ्यांनी या भागाचा ताबा घेतल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तोपर्यंत हे ठिकाण सर्वसामान्यांसाठी बंद राहणार आहे. ड्रोनद्वारे हवाई आणि तांत्रिक देखरेख केली जात असून शोधपथके तसेच गस्तही वाढवण्यात आल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा >>> अयोध्येत रामभक्तांची गर्दी ; रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा पहिला वर्धापन दिन सोहळा
वैशिष्ट्ये
● श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्गावरील ‘झेड मोढ’ बोगद्यासाठी २,४०० कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.
● ६.५ किमी लांबीचा हा बोगदा असून त्यामुळे श्रीनगर ते लडाख हा मार्ग बाराही महिने खुला राहील.
● प्रकल्पाचे काम मे २०१५ मध्ये सुरू झाले आणि गेल्या वर्षी पूर्ण झाले.
● ८,६५० फूट उंचीवर स्थित बोगदा द्विपदरी असून गगनगीर आणि सोनमर्ग दरम्यान संपर्क प्रस्थापित करण्याकरिता महत्त्वपूर्ण आहे.