तिहार तुरूंगाच्या बराक नंबर दोनमध्ये कुख्यात गुंड छोटा राजन याला ठेवले असून त्याची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्याला भारतात आणल्यानंतर चौदा दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
तुरूंगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, तुरूंग अधिकाऱ्यांना राजनची सुरक्षा कडक करण्याचे आदेश दिले असून त्यासाठी १० हेड वॉर्डर्स, १० वॉर्डर्स, एक उप अधीक्षक व दोन सहायक अधीक्षक यांना विविध तुरूंगातून येथे तैनात करण्यात आले आहे. महासंचालकांनी याबाबत तुरूंग कर्मचाऱ्यांना माहिती दिली असून सुरक्षेत हयगय चालणार नाही असा इशारा दिला आहे. राजन याला काल अतिशय कडक सुरक्षा असलेल्या तिहार तुरूंगात आणले असून त्याला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. सीबीायने त्याच्याविरोधातील सर्व ७१ गुन्ह्य़ांचा तपास हाती घेतला असून महाराष्ट्रातील गुन्ह्य़ांचाही त्यात समावेश आहे. राजन याला मुंबईत ज्यांची भेट घ्यायची आहे त्यात त्याची पत्नी व एका मित्राचे नाव त्याने दिले आहे. त्यामुळे ते कदाचित त्याला भेटू शकतील. भारत-तिबेट सीमा दल व केंद्रीय राखीव पोलिस दलाचे जवान तुरूंगाबाहेर तैनात करण्यात आले असून बाहेरून कुठल्याही गोष्टी त्याला मिळू नयेत याची काळजी घेण्यात येत आहे. राजन याला २७ वर्षांनंतर ताब्यात घेण्यात आले असून त्याला खोटय़ा पासपोर्टप्रकरणी सीबीआय कोठडी दिली आहे. राजन हा एकेकाळी दाऊदचा मित्र होता, पण नंतर त्यांचे बिनसले होते. दिल्ली व मुंबई पोलिसात त्याच्याविरोधात अमली पदार्थाची तस्करी, खंडणी, खून असे अनेक गुन्हे दाखल आहेत. २५ ऑक्टोबरला त्याला बाली येथे अटक करण्यात आली होती व नंतर सीबीआयने त्याला ताब्यात घेऊन भारतात आणले होते.