पावसामुळे संरक्षण मंत्रालयाची योजना; प्रजासत्ताक दिन कार्यक्रमासाठी कडेकोट सुरक्षा
पठाणकोटमधील हल्ल्याची घटना ताजी असताना देशभर साजरा होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी संपूर्ण दिल्लीत सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. संसद भवन, राष्ट्रपती भवन व राजपथाच्या परिसराचा ताबा सुरक्षारक्षकांनी घेतला आहे. गेल्या दोन दिवसांपासून तापमानात घट झाल्याने थंडीची लाट आली आहे. गतवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात पावसाने हजेरी लावली होती. त्या वेळी प्रमुख अतिथी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यावर सुरक्षारक्षकांना छत्री धरावी लागली होती. याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी यंदा खास व्यवस्था करण्यात आली आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे आसन दालनावर काचेचे आच्छादन लावण्यात येईल. हवाई कसरती सुरू होण्यापूर्वी हे आच्छादन हटवण्यात येतील. यंदा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सिस ओलांद प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
दिल्लीच्या लहरी हवामानाचा परिणाम प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यावर कधीही होत नाही. सामान्य नागरिक, निमंत्रित, अतिमहत्त्वाचे व्यक्ती, नेते- कडाक्याच्या थंडीतदेखील इंडिया गेटच्या खुल्या परिसरातउत्साहाने या सोहळ्याचे साक्षीदार होतात.
गतवर्षी पावसाची रिपरिप अंगावर घेत सामान्यांनी हा सोहळा अनुभवला होता. तेव्हा अतिमहत्त्वाच्या व्यक्तींवर छत्री धरण्यात आली होती. हा प्रकार यंदा टाळण्यात येणार आहे. हवामान खात्याने पुढील दोन दिवस दाट धुके पडणार असल्याचे भाकीत वर्तवले असले तरी पावसाची शक्यता मात्र व्यक्त केलेली नाही. संरक्षण मंत्रालयाने मात्र अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी असलेल्या दालनावर काचेचे आच्छादन टाकण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रयोग पहिल्यांदाच करण्यात येणार आहे. प्रजासत्ताक सोहळ्याचे चांगले प्रसारण करता येण्यासाठी दूरदर्शनने ‘ड्रोन’ कॅमेऱ्याचा वापर करण्याची परवानगी मागितली होती. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव मंत्रालयाकडून ती नाकारण्यात आली. प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी दूरदर्शनने शंभर कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे.

Story img Loader