पंतप्रधान मोदी हे आजपासून तीन दिवसीय अमेरिका दौऱ्यावर असून आज सकाळीच ते डेलावेयरसाठी रवाना झाले आहेत. यादरम्यान ते क्वाड शिखर संम्मेलानात सहभागी होणार आहेत. तसेच संयुक्त राष्ट्राच्या महासभेलाही संबोधित करणार आहेत. याशिवाय प्रवासी भारतीयांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमातही पंतप्रधान मोदी सहभागी होणार असल्याची माहिती आहे. महत्त्वाचे म्हणजे दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे.

‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याच्या १५ दिवसांपूर्वीच दोन्ही देशातील सुरक्षा अधिकाऱ्यांची यासंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीत मोदींच्या दौऱ्यादरम्यान सुरक्षेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेला हल्ला तसेच खलिस्तानी समर्थकांच्या विरोधाच्या पार्श्वभू्मीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.

हेही वाचा – Donald Trump Will Meet Modi : “मोदी विलक्षण माणूस, त्यांची भेट घेणार”, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर

डेलावेयर येथे पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भेट घेणार आहेत. त्या भेटीनंतर दोन्ही नेते क्वाड परिषदेसाठी रवाना होणार असल्याचे सांगितले जातं आहे. या परिषदेला जपान आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधानही उपस्थित राहणार आहेत. डेलावेयर येथील आर्कमेअर अकादमीमध्ये दोन्ही नेत्यांची भेट होणार असून या परिसरात सामान्य नागरिकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. या भागात खलिस्तानी समर्थक घुसखोरी करण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. या ठिकाणी कोणतीही गर्दी किंवा विद्यार्थी उपस्थित राहणार नाही, हे सुनिश्चित करण्यात आलं आहे.

हेही वाचा – Venus Orbiter Misson : आता शुक्रावर स्वारी! चांद्रयान आणि मंगळयान मोहिमेनंतर भारताचं नवं उड्डाण! व्हिनस मिशनला कॅबिनेटची मंजुरी

याशिवाय पंतप्रधान मोदी यांच्या न्यूयॉर्क येथील कार्यक्रमस्थळी मोठ्या प्रमाणात सुरक्षा अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. त्यासाठी एसपीजी आणि यूएस सीक्रेट सर्व्हिसचे अधिकारी समन्वय साधत आहेत. पंतप्रधान मोदी २२ सप्टेंबर रोजी या ठिकाणी प्रवासी भारतीयांना संबोंधित करणार आहेत. न्यूयॉर्कमधील नासाऊ येथे हा कार्यक्रम होणार आहे. पुढे २३ सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदी संयुक्त राष्ट्राच्या महासभेला संबोधित करणार असून २४ सप्टेंबर रोजी ते भारतात परतणार आहेत.