पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशाला लाल किल्ल्यावरुन संबोधित केलं. १५ ऑगस्टच्या निमित्ताने देशाला त्यांचं हे दहावं संबोधन होतं. बिगर काँग्रेसी पंतप्रधानांपैकी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे असे एकमेव पंतप्रधान आहेत ज्यांनी सलग दहावेळा लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या भाषणात दहा वर्षांच्या कार्यकाळाचा लेखाजोखा मांडला. तसंच काँग्रेसवर कडाडून टीका ही केली. भ्रष्टाचाराच्या राक्षसाने आपला विळखा देशाभोवती घातला होता आणि देशाला घट्ट पकडून ठेवलं होतं असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर टीका केली. तर दुसरीकडे पुढच्या वर्षी म्हणजेच २०२४ मध्येही आपणच लाल किल्ल्यावरुन भाषण करु असा विश्वासही व्यक्त केला.
काय म्हणाले आहेत नरेंद्र मोदी?
“२०१४ मध्ये मी तुम्हाला परिवर्तन घडेल असं आश्वासन दिलं होतं. त्यावेळी तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवलात आणि मला या सर्वोच्च पदावर बसवलं. २०१९ मध्ये तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर पुन्हा विश्वास दाखवला आणि आशीर्वाद दिला. आता २०२४ साठीही मला आशीर्वाद द्या. पुढच्या १५ ऑगस्टला मी पुन्हा तुमच्यासमोर येईन. मी तुमच्यासाठीच जिंकतो आहे, जिंकेन. मी जे कष्ट उपसतो आहे ते तुमच्यासाठीच आहेत. कारण सगळे भारतीय हे माझं कुटुंब आहेत. मी तुमचं दुःख सहन करु शकत नाही.” असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुढच्या टर्ममध्येही आपणच पंतप्रधान असू हा विश्वास व्यक्त केला.
हे पण वाचा- पंतप्रधान नरेंद्र मोदींचं देशाला दहावं संबोधन, जाणून घ्या भाषणातले ठळक मुद्दे
मणिपूरवरही भाष्य
आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मणिपूरचाही उल्लेख केला. मणिपूरमध्ये आणि हिंदुस्थानच्या इतरही काही भागात हिंसाचार झाला. आई-बहिणींच्या सन्मानाला धक्का लावण्यात आला. देश मणिपूरच्या पाठिशी आहे. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मणिपूरमधील समस्येवर शांततेतून तोडगा काढणार आहे. मणिपूरमध्ये केंद्र आणि राज्य सरकार शांतता राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत आणि करत राहू. असंही मोदींनी म्हटलं आहे.
हे पण वाचा- येत्या ५ वर्षांत भारत जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये असेल ही मोदींची गॅरंटी; पंतप्रधानांचा पुनरुच्चार
लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदी म्हणाले, आज देशातील तरुणांना जेवढे भाग्य लाभले आहे तेवढे क्वचितच कुणाला मिळते.आपण ते गमावू नये. येणारा काळ हा तंत्रज्ञानाच्या प्रभावाचा असणार आहे. आपली छोटी शहरे आणि शहरे लोकसंख्येच्या दृष्टीने लहान असतील पण त्यांची क्षमता कोणापेक्षाही मागे नाही. देशात संधींची कमतरता नाही. आपल्याला पाहिजे तितक्या संधी देण्याची क्षमता या देशामध्ये आहे.बदलत्या जगाला भारत आकार देणार आहे.