प्रेमाला सीमांचं बंधन नसतं, असा संवाद चित्रपटातून आपण अनेकदा ऐकला असेल. सोशल मीडियामुळे हल्ली प्रेमाच्या सीमा तशा धुसर झाल्यात. इंटरनेटच्या माध्यमातून जगाच्या दोन कोपऱ्यात असलेले जोडपी एकमेकांवर प्रेम करतात. तर काही धाडसी जोडपी आपलं प्रेम पूर्ण करण्यासाठी या सीमा वैध किंवा अवैधपणे ओलांडतात. पाकिस्तानातील सीमा हैदर सचिन मीणा या युवकाशी लग्न करण्यासाठी आपल्या चार मुलांसह भारतात बेकायदेशीरपणे आली होती. आता या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद येथील ट्रॅव्हल व्लॉगरशी लग्न करण्यासाठी एक इराणी तरुणी भारतात आली आहे.
इराणमधील फैजा नावाची तरुणी आपल्या वडिलांसह २० दिवसांच्या व्हिसावर भारतात आली आहे. फैजा इराणच्या हमदान शहरातील रहिवासी आहे. सध्या ती मुरादाबादमध्ये तिचा प्रियकर दिवाकर कुमारबरोबर राहत आहेत. दोघांच्या लग्नाला रितसर परवानगी मिळावी, यासाठी ते कायदेशीर प्रक्रिया पार पाडत आहे. दरम्यान फैजा आणि दिवाकर या दोघांनी अनोख्या पद्धतीने आपला साखरपुडा पार पाडला.
तीन वर्षांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिवाकर आणि फैजा यांची ओळख झाली आणि त्यानंतर त्यांच्यात प्रेम फुलू लागले. दिवाकरने जुन्या दिवसांची आठवण सांगताना म्हटले, “मी माझ्या ट्रॅव्हल व्लॉगची प्रसिद्धी सोशल मीडियावर करत असे. त्यादरम्यान फैजाची आणि माझी ओळख झाली. पुढे एकमेकांशी चर्चा करत असताना आमचे प्रेम झाले.” मागच्या वर्षी जुलै महिन्यात दिवाकरने फैजाची भेट घेण्यासाठी इराणवारी केली होती. इराणच्या भेटीदरम्यान मी पर्शियन भाषा शिकण्याचा प्रयत्न केला. फैजानेही हिंदीशी नाळ जोडण्याचा प्रयत्न केला. जेणेकरून भावी जीवनात आम्हाला संवाद साधताना अडचण येणार नाही, असे दिवाकरने सांगितले.
फैजाने स्वतःबद्दल माहिती देताना सांगितले की, माझे कुटुंब अक्रोडची शेती करते. मी स्थानिक विद्यापीठातून माझे शिक्षण पूर्ण केलं आहे. फैजाने पुढे म्हटले की, तिचे वडील मसूद आणि तिला ताजमहल आणि अयोध्येतील राम मंदिराचे सर्वप्रथम दर्शन घ्यायचे आहे. त्यानंतर ते उर्वरित भारत भ्रमण करणार आहेत. फैजा इराणी नागरिक आणि वेगळ्या धर्मातून येत आहे. याबाबत बोलताना दिवाकर म्हणाला की, माझ्या कुटुंबाने आमच्या नात्याचा स्वीकार केला आहे. आता प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आम्ही लवकरच लग्न करू, असे त्याने सांगितले.
मागच्या वर्षी सीमा हैदरने बेकायदेशीररित्या सीमा ओलांडून भारतात प्रवेश केला होता. बांगलादेशमधील एका तरुणीने प्रेमासाठी अवैधरित्या पश्चिम बंगालमध्ये प्रवेश केला होता. मात्र पश्चिम बंगालमध्ये आल्यानंतर तिच्या प्रियकराने तिला नेपाळमध्ये विकण्याचा प्रयत्न केला. प्रियकराचे सत्य समजल्यानंतर तिने कशीबशी त्यापासून सुटका मिळवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र सिलिगुरी रेल्वे स्थानकावर संशयास्पद हालचालीमुळे तिला अटक करण्यात आले. सध्या तिच्यावर अवैधरित्या भारतात प्रवेश केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तिच्या प्रियकराचा शोध सुरू आहे.