पाकिस्तानी प्रेसयी सीमा हैदर आणि भारतीय प्रियकर सचिन मीना यांची प्रेम कहानी देशभर चर्चेचा विषय ठरली आहे. आंतरदेशीय या प्रेमप्रकरणातील रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. दरम्यान, सीमा हैदरने दयेची याचिका आणि कायमचं नागरिकत्त्व मिळावं याकरता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिले आहे. सीमा हैदरच्या वतीने सर्वोच्च न्यायालयातील वकिल ए.पी.सिंग यांनी हे पत्र लिहिले आहे. राष्ट्रपतींनी या प्रकरणाची तोंडी सुनावणी घ्यावी, अशी मागणीही या पत्राद्वारे करण्यात आली आहे.
पत्रात काय लिहिलं आहे?
“माननीय मॅडम, माझ्या याचिकाकर्त्याला (सीमा हैदर) प्रेम, शांती आणि आनंद पती सचिन मीना आणि सासू-सासऱ्यांच्या रुपाने मिळाले आहे. जे तिला याआधी कधीही लाभले नव्हते. त्यामुळे माझ्या याचिकाकर्त्यावर विश्वास ठेवा आणि तिच्यावर दया करा. ती उच्चशिक्षित नाही”, असं या पत्रात म्हटलं आहे. “तुम्ही दया दाखवली तर याचिकाकर्ती तिचं उर्वरित आयुष्य तिचा पती, तिची चार मुलं आणि तिच्या सासू-सासरच्यांसह आनंदाने व्यतीत करेल”, असंही म्हटलं आहे. या पत्रात सीमाने तिची प्रेमकहानीही लिहिली आहे.
हेही वाचा >> लष्कराशी संबंधित लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती का? सीमा हैदरने ‘या’ सात प्रश्नांची काय उत्तरं दिली?
सीमा हैदर आणि सचिन मीना यांच्यात कशी झाली ओळख?
सीमा हैदर मुळची पाकिस्तानची असून तिला चार मुलं आहेत. तर सचिन मीना हा ग्रेटर नोएडा येथे राहणारा आहे. जागरण या वृत्तसंकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, या दोघांची भेट २०१९ मध्ये म्हणजेच कोरोनाकाळात झाली. दोघांनाही पबजी खेळण्याचं वेड होतं. पबजी खेळता खेळता दोघांमध्ये ओळख वाढली. त्यामुळे ते ऑनलाईन अॅपवर तासन् तास गप्पा मारत राहायचे. चार महिने गप्पा मारून झाल्यावर दोघांनी एकमेकांचा नंबर शेअर केला. त्यानंतर, दोघांमध्ये ऑडिओ आणि व्हिडीओ स्वरुपात गप्पा होऊ लागल्या.
हेही वाचा >> पाकिस्तानी मुस्लिम महिलेचं भारतीय हिंदू तरुणाशी प्रेमप्रकरण! नक्की काय घडलं?
बेकायदा प्रवेश आणि वास्तव्य यामुळे झाली शिक्षा
दरम्यान, ४ जुलै रोजी सीमा हैदर तिच्या चार मुलांना घेऊन नेपाळमार्गे भारतात आली. तिच्याकडे भारतात प्रवास करण्याचा किंवा भारतात राहण्यासाठी कोणताही व्हिजा नव्हता. नेपाळमार्गे अवैधरित्या तिने भारतात प्रवेश केला. तिने भारतात बेकायदा वास्तव्य केल्याने तिच्यासह सचिनलाही अटक करण्यात आली.