स्वयंघोषित बाबा आणि त्यांचे कारनामे याचे अनेक किस्से वारंवार समोर येत असतात. अशा घटनांमुळे अनेक सामान्य नागरिकांची मोठी फसवणूक झाल्याचेही प्रकार पोलीस तपासात उघड झाले आहेत. उत्तराखंडमध्ये अशाच प्रकारे एका स्वयंघोषित बाबाने तब्बल १६ हजार ५०० फुटांवर बेकायदेशीररीत्या देवीचं मंदिर बांधलं आहे. आपल्याला देवीनं स्वप्नात येऊन त्या ठिकाणी मंदिर बांधण्याचे आदेश दिल्याचा दावा या बाबानं केला आहे. टाइम्स ऑफ इंडियानं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे. स्थानिक प्रशासनाला हा प्रकार लक्षात येताच त्यांनी यासंदर्भात चौकशी सुरू केली आहे.
नेमका प्रकार काय?
उत्तराखंडमधील डोंगराळ भाग आणि त्यावर साचलेला बर्फ, तिथला निसर्गरम्य परिसर हे पर्यटकांसाठी मोठं आकर्षण असतं. पण त्याचबरोबरीने पर्यावरणाच्या दृष्टीनेही हा भाग संवेदनशील असून इथले अनेक भाग इको-सेन्सिटिव्ह झोन म्हणून प्रशासनाने जाहीर केले आहेत. याचाच अर्थ या ठिकाणी कोणतंही बांधकाम केलं जाऊ शकत नाही. असल्यास त्यासाठी सर्व संबंधित विभागांची पूर्वपरवानगी आवश्यक ठरते. पण उत्तराखंडच्या बागेश्वर भागातल्या सुंदरधंगा पर्वतराजीमधल्या एका पर्वतावर एका स्वयंघोषित बाबाने कुणाच्याही नकळत चक्क एक मंदिर बांधलं आहे. यासाठी त्यानं केलेला दावाही अजब आहे.
बाबा योगी चैतन्य आकाश असं या बाबाचं नाव असून आपल्याला थेट देवीनंच स्वप्नात येऊन या ठिकाणी मंदीर बांधण्याचे आदेश दिल्याचा दावा त्यानं स्थानिक गावकऱ्यांसमोर केल्याचं टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात म्हटलं आहे. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून चक्क १६ हजार ५०० फूट उंचीवर असून तिथपर्यंत हा बाबा पोहोचला कसा? याचीही आपबीती इथले गावकरी सांगतात.
शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचं वक्तव्य, “नरेंद्र मोदी आमचे शत्रू नाहीत, पण…”
गावकऱ्यांच्याच मदतीने बांधलं मंदिर!
काही स्थानिकांना बाबानं नियम डावलून मनमानी पद्धतीने हे बांधकाम केल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी यासंदर्भात माहिती द्यायला सुरुवात केली. बाबा योगी चैतन्य आकाश यानं गावकऱ्यांना ठामपणे सांगितलं की थेट देवी भगवती मातेनंच स्वप्नात येऊन आपल्याला हे मंदिर या ठिकाणी बांधण्याचे आदेश दिले. स्थानिक गावकऱ्यांचा त्याच्यावर विश्वास बसला. गावकऱ्यांनीच मंदिराच्या बांधकामासाठी लागणारं साहित्य एवढ्या उंचीवर वाहून नेण्यात त्याला मदत केली. त्यांच्याच सहकार्याने बाबाने हे मंदिरही बांधलं आणि त्यानंतर तिथे रीतसर पूजा-अर्चा करायला सुरुवात केली!
पवित्र कुंडाचा केला स्वीमिंग पूल!
दरम्यान, बाबांनी या ठिकाणी असणाऱ्या पवित्र कुंडाचा स्वीमिंग पूल म्हणून वापर करायला सुरुवात केल्याचाही आरोप काही स्थानिकांनी केला आहे. स्थानिक भाविकांसाठी हे कुंड म्हणजे एक पविस्तर स्थान असून दर १२ वर्षांनी इथे होणाऱ्या नंद राज यात्रेदरम्यान भाविक या कुंडात पवित्र स्नान करतात. पण अनेकदा बाबा त्या कुंडात आंघोळ करताना दिसतात, असा आरोप काही स्थानिकांनी केला आहे.
स्थानिक प्रशासनाची चौकशीला सुरुवात
हे प्रकरण चर्चेत आल्यानंतर स्थानिक प्रशासनानं यासंदर्भात चौकशीला सुरुवात केली आहे. वनविभाग, पोलीस आणि महसूल विभागाचं पथक लवकरच या ठिकाणी भेट देणार असून अनधिकृतरीत्या केलेलं हे बांधकाम हटवलं जाईल, अशी माहिती प्रशासनानं दिली आहे. तसेच, या स्वयंघोषित बाबावर योग्य ती कारवाईही केली जाणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.