Swami Nithyananda Associates Arrested : जवळपास सहा वर्षांपूर्वी स्वामी नित्यानंद चर्चेत आला होता. एकीकडे बलात्कार, छळ आणि बाल लैंगिक शोषण प्रकरणी स्वामी नित्यानंदवर कारवाई चालू होती तर दुसरीकडे आपल्याला विश्वज्ञान झाल्याचा दावा करत नित्यानंद अनुयायांना भुलवत होता. या सगळ्या घडामोडींमध्ये स्वामी नित्यानंतर भारतातून पलायन करण्यात यशस्वी झाला. मधल्या काळात त्याचा कुठेच थांगपत्ता नव्हता. नंतर अचानक ‘युनायडेट स्टेट्‍स ऑफ कैलास’ हे जगातलं सर्वोत्कृष्ट हिंदू राष्ट्र स्थापन केल्याचा दावा त्यानं केला. आता नित्यानंदच्या काही सहकाऱ्यांना बोलिव्हियामध्ये फसवणूक प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं?

गेल्या आठवड्यात बोलिव्हियामधील पोलीस प्रशासनाने नित्यानंदच्या युनायडेट स्टेट्‍स ऑफ कैलासमधील काही कथित पदाधिकाऱ्यांना अटक केली. अॅमेझॉनच्या जंगलातल्या काही आदिवासी समूहांची फसवणूक करून त्यांच्या ताब्यातील जमीन तब्बल १ हजार वर्षांच्या भाडे करारावर लाटण्याच्या प्रयत्नात ही मंडळी असतानाच पोलिसांना सुगावा लागला आणि त्यांना अटक करण्यात आली. यानंतर त्यांना त्यांच्या देशात परत पाठवण्यात आलं. पण हा देश म्हणजे कैलास नसून त्यांच्या खऱ्या देशांमध्ये म्हणजेच भारत, अमेरिका, स्वीडन आणि चीन इथे त्यांची रवानगी करण्यात आली आहे. दी न्यूयॉर्क टाइम्सनं यासंदर्भात सविस्तर वृत्त दिलं आहे.

‘कैलास’चे पदाधिकारी टुरिस्ट व्हिसावर बोलिव्हियामध्ये दाखल झाले होते. तिथे त्यांनी बोलिव्हियाचे अध्यक्ष लुईस आर्क यांच्याबरोबर फोटो काढले. यावेळी नित्यानंद त्यांच्यासोबत होता की नाही हे निश्चित होऊ शकलेलं नाही. पण जेव्हा बोलिव्हियातील स्थानिक वर्तमानपत्रामध्ये कैलाशच्या पदाधिकाऱ्यांनी काही आदिवासी समूहांशी करार केल्याची बाब प्रसिद्ध झाली, तेव्हा हा सगळा प्रकार उघड झाला.

स्वामी नित्यानंदच्या सहकाऱ्यांनी आधी या समूहांशी २५ वर्षांसाठीचे भाडेकरार केले होते. त्याबदल्यात त्यांना दरवर्षी २ लाख डॉलर्स देण्याचंही मान्य करण्यात आलं. पण जेव्हा कागदपत्र तयार करण्यात आली, तेव्हा त्यात २५ ऐवजी तब्बल १ हजार वर्षांचा उल्लेख करण्यात आला. बोलिव्हिया प्रशासनाने हे करार रद्द ठरवले असून या २० जणांवर स्थानिक कायद्यानुसार कारवाई सुरू केली आहे.

कोण आहे स्वामी नित्यानंद?

स्वामी नित्यानंदचं खरं नाव अरुणाचलम राजशेखरन असून विशीत असताना तो आधी हिंदू साधू झाला आणि नंतर त्यानं बंगळुरूच्या आयटी हबजवळ आपला पहिला आश्रम सुरू केला. लवकरच त्याचा अनुयायी वर्ग भारतातच नाही तर जगभरात तयार होऊ लागला. पण २०१९ मध्ये त्याच्यावर बलात्कार, छळवणूक व बाल लैंगिक शोषणाचे आरोप झाले आणि तो देश सोडून पळून गेला. त्याने दक्षिण अमेरिकेतील इक्वोडोर देशाच्या जवळ एक बेट विकत घेतले असून त्या बेटाला देश म्हणून घोषित केलं. आता बोलिव्हियातील या प्रकरणामुळे पुन्हा एकदा स्वामी नित्यानंद चर्चेत आला आहे.