हरयाणातील स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु रामपालला हिस्सार सत्र न्यायालयाने मंगळवारी दोन हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली. रामपालसह एकूण १३ जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश डी.आर.चालिया यांनी २०१४ सालच्या या प्रकरणात रामपालला शिक्षा सुनावली.

 

देशद्रोह आणि हत्येचा आरोप असलेल्या स्वयंघोषित गुरु रामपाल याला हिस्सार कोर्टाने ११ ऑक्टोंबरला दोन्ही गुन्ह्यात दोषी ठरवले होते. रामपालला शिक्षा सुनावताना न्यायालय परिसरात कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

हिस्सारच्या बरवाला शहरात रामपालचा सतलोक आश्रम होता. १९ नोव्हेंबर २०१४ रोजी त्याच्या आश्रमात चार महिला आणि एक लहान मुल मृतावस्थेत सापडले होते. त्यावेळी पोलिसांनी रामपाल आणि त्याच्या २७ समर्थकांविरोधात हत्या आणि अन्य आरोपांप्रकरणी गुन्हे दाखल केले होते.

२०१४ साली पोलीस पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाच्या आदेशावरुन त्याला अटक करण्यासाठी गेले त्यावेळी रामपालचे समर्थक आणि पोलिसांमध्ये मोठी चकमक झाली होती. रामपालचे सर्व सुरक्षारक्षक शस्त्रसज्ज होते. त्याने त्या दिवशी अटक टाळण्यासाठी समर्थकांचा मानवी ढालीसारखा वापर केला होता.

काय आहे प्रकरण आणि कशी केली अटक?
२००६ मध्ये रामपाल यांनी ‘सत्यार्थ प्रकाश’ या धार्मिक पुस्तकातील काही भागावर आक्षेप घेतला होता. यामुळे रामपाल आणि आर्य समाजाच्या लोकांमध्ये वाद निर्माण झाला होता. यावेळी लोकांनी रोहतकमधील रामपाल यांचा आश्रम बंद करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर रामपाल यांच्या समर्थकांनी त्यांच्यावर गोळीबारही केला होता. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला होता. तर १६० जण जखमी झाले होते. यानंतर न्यायालयाने रामपाल यांना ४३ वेळा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, तरीही रामपाल न्यायालयात हजेरी लावत नव्हते. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने पोलिस रामपाल यांना ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या रोहतक येथील आश्रमात पोहोचले होते. मात्र, याठिकाणी रामपाल यांचे १५ हजार समर्थक आधीच हजर होते. यावेळी त्यांनी पोलिसांवरच दगडफेक, गोळीबार, पेट्रोल बॉम्ब आणि अॅसिड बॉम्बचा हल्ला चढवला होता.

कोण हा रामपाल?
१९५१मध्ये सोनपत येथील एका शेतकरी कुटुंबात जन्मलेला रामपाल हरयाणा सरकारच्या पाटबंधारे खात्यात कनिष्ठ अभियंता होता. सेवेतील कुचराईवरून त्याला काढले गेल्याचे बोलले जाते, १८ वर्षांच्या सेवेनंतर ते स्वत:हून निवृत्त झाले, असे त्यांचे समर्थक सांगतात. सेवेत असतानाच १९९९मध्ये त्याने आपला पहिला आश्रम काढला. नंतर आपण संत कबीरांचा अवतार आहोत, असे त्याने जाहीर केले व हरयाणात अनेक भागांत आश्रम काढले. २००६ पासून देशद्रोह आणि हत्येचा खटला सुरु झाला. त्यानंतर चर्चेत आला. हत्येप्रकरणी २०१४ मध्ये स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू रामपालला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या.

Story img Loader